आपला जिल्हा

नगराध्यक्ष बालासाहेब जाधव अॅक्शन मोडवर!

भाजी विक्रेत्यांचे पुनर्वसन; वाहतुकीला दिलासा, स्वच्छतेवरही भर देणार

किल्लेधारूर : शहरातील हनुमान चौक परिसरात रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता नगराध्यक्ष बालासाहेब रामराव जाधव यांनी प्रत्यक्ष पाहणी करून विक्रेत्यांसाठी योग्य जागेचे नियोजन केले. या निर्णयामुळे रस्ता मोकळा होऊन वाहतूक सुरळीत होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, तक्रारींना गांभीर्याने घेत नगराध्यक्ष बालासाहेब जाधव यांनी अॅक्शनमोड स्वीकारला आहे. या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले असून, बाजारपेठ परिसरात वाहतूक सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

नगराध्यक्ष बालासाहेब जाधव म्हणाले की, भाजी विक्रेत्यांवर कोणताही अन्याय होऊ नये यासाठी त्यांना पर्यायी व अधिक सोयीस्कर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्यापाऱ्यांचे हित जपतानाच शहरातील शिस्त आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या ठिकाणी आवश्यक बदल केले. त्यामुळे हनुमान चौक परिसरात भविष्यात कोंडी होणार नाही, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. दरम्यान, शहर स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येकाने आपल्या दुकानातील व घरातील कचरा घंटागाडीतच टाकावा व रस्त्यावर कचरा टाकू नये, असे आवाहन नगरपरिषद किल्ले धारूर तर्फे करण्यात आले. शहराच्या विकासासाठी प्रशासन व नागरिकांनी एकत्रितपणे काम केल्यास किल्ले धारूर अधिक स्वच्छ, सुबक आणि वाहतूकदृष्ट्या सुसज्ज शहर म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Comment here