महा-राष्ट्र

अजित पवार यांच्या स्मरणार्थ वरळी येथे शोकसभा; मान्यवरांच्या डोळ्यांत अश्रू

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ वरळी येथे आयोजित शोकसभेत अनेक मान्यवरांनी अत्यंत हळव्या शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली. सभागृहात दादांच्या कार्याचा, त्यांच्या जिव्हाळ्याच्या स्वभावाचा आणि राज्यासाठी त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांचा भावनिक उल्लेख होत होता.

वरळी येथील एनएससीआय डोम येथे अजित पवार यांची मंगळवारी सायंकाळी शोकसभा आयोजित केली होती. शोकसभेला राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री, आमदार, सनदी अधिकारी, उद्योजक, सर्वपक्षीय नेते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व अजित पवार यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

“अजित पवारांचे अकाली निधन महाराष्ट्रावरचा आघात आहे. त्यांच्या व्यक्तीमत्वात व्यावसायिकता होती. राज्याच्या विकासाची दृष्टी होती. लोकाभिमुख असूनही सत्य सांगणारा हा नेता होता, या शब्दात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज्याची दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विषयी सहवेदना व्यक्त केल्या.”

“कोणत्याही मुख्यमंत्र्यांना अजित पवारांप्रमाणे कडक शिस्तीचा आणि काटकसरीचा अर्थमंत्री हवा. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे काम सोपे होते, असे स्पष्ट करत अजित पवार हे वेगळ्या क्षितीजाकडे चाललले नेतृत्व होते. त्यांची खुप स्वप्ने होती, मात्र ती पूर्ण होण्यापूर्वी ते आपल्यातून निघून जाणे खूप वेदनादायी आहे, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना प्रकट केल्या.”

दादांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे कणखर नेतृत्व, अचूक निर्णयक्षमता आणि जनतेशी असलेली जिव्हाळ्याची नाळ यांचा विलक्षण संगम होता, अशा भावना अनेक वक्त्यांनी व्यक्त केल्या. बारामतीपासून ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत विकासाचा ध्यास घेऊन कार्य करणारा हा लोकनेता आज आपल्यात नसल्याची जाणीव प्रत्येकाच्या शब्दांतून प्रकर्षाने जाणवत होती.

विविध क्षेत्रातील मान्यवर, सहकारी, कार्यकर्ते आणि असंख्य नागरिकांनी दादांबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या साधेपणाची, कार्यतत्परतेची आणि निर्णयक्षमतेची आठवण काढताना अनेकांचे डोळे पाणावले. दादांनी रुजवलेली कामाची शिस्त, दूरदृष्टीतून आखलेला विकासाचा मार्ग आणि लोकहितासाठीची अखंड तळमळ ही पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. त्यांच्या स्वप्नातील सक्षम आणि समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी नव्या जोमाने कार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.  

Comment here