थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन
माजलगाव : थकीत ऊस बिलाच्या प्रश्नावरून माजलगावात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन दोन तास अडवून ठिय्या आंदोलन केले. मंगळवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर युवा शेतकरी संघर्ष समितीने हे आंदोलन केले.
माजलगाव मतदारसंघातील तीन साखर कारखाने तसेच गूळ युनिटकडून शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल थकीत आहे. जनता दरबारसाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन येताच संतप्त शेतकऱ्यांनी त्यांचे वाहन अडवले. तसेच ठिय्या मांडून दुपारी १२.३० ते २.३० दरम्यान आंदोलन केले. यावेळी अधिकाऱ्यांनी धाव घेत आंदोलकांशी चर्चा केली. दीर्घ चर्चेनंतर प्रशासनाने थकीत ऊस बिलाबाबत तातडीने निर्णय घेण्याचे आणि शेतकऱ्यांचे पेमेंट थकवणाऱ्या संबंधित साखर कारखान्यांवर आणि गुळ युनिवटर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. यावेळी भाई नारायण गोले पाटील, कॉम्रेड मोहन जाधव, अजय राऊत, नामदेव सोजे, यांच्यासह अनेक शेतकरी व युवा शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
तीव्र आंदोलन करणार; शेतकऱ्यांचा इशारा
शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल लवकरात लवकर अदा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा युवा शेतकरी संघर्ष समितीने दिला. या आंदोलनामुळे ऊस उत्पादकांच्या थकीत बिलाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.



Comment here