बीड : प.पू.पूर्णवाद प्रणेते डॉ.रामचंद्र महाराज पारनेरकर आणि प.पू.पूर्णवाद वर्धिष्णू डॉ.विष्णु महाराज पारनेरकर यांच्या जन्मतिथीनिमित्त पूर्णवादी नागरिक सहकारी बँक मर्या., बीडच्या २५ शाखांमध्ये आयोजित रक्तदान शिबिराला ग्राहक, सभासद, हितचिंतक आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दोन दिवस चाललेल्या या उपक्रमात तब्बल ३६७ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची जाणीव जपली.
प.पू.पूर्णवाद प्रणेते डॉ.रामचंद्र महाराज पारनेरकर आणि प.पू.पूर्णवाद वर्धिष्णू डॉ.विष्णु महाराज पारनेरकर यांच्या जन्मतिथीनिमित्त पूर्णवादी नागरिक सहकारी बँक मर्या., बीडच्या वतीने दि. २७ व २९ जुलै २०२६ रोजी राज्यभरातील २५ शाखांमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला ग्राहक, सभासद, हितचिंतक, कर्मचारी तसेच पूर्णवाद परिवारातील शिष्य मंडळींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात एकूण ३६७ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली संवेदनशीलता आणि सामाजिक उत्तरदायित्व अधोरेखित केले.
दि.२७ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथील जालना रोड शाखेच्या शिबिराचे उद्घाटन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण तथा दुग्धव्यवसाय विकास मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते झाले. सातारा परिसर शाखेचे उद्घाटन महापौर समीर राजूरकर, तर जालना शाखेचे उद्घाटन स्थायी समिती अध्यक्ष लक्ष्मीकांत पांगारकर यांच्या हस्ते करण्यात आले. दि.२९ जुलै रोजी बीड येथील तिन्ही शाखांच्या संयुक्त रक्तदान शिबिराचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी हरिष धार्मिक आणि जिल्हा उपनिबंधक सतीश तोटावार यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्य कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प.पू.डॉ.रामचंद्र महाराज पारनेरकर, प.पू.डॉ.विष्णु महाराज पारनेरकर तसेच भारतमाता यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
बँकेचे अध्यक्ष डॉ.सुभाष जोशी, संचालक सुहास तेंडुलकर, विश्वनाथ माणुसमारे, इंजि.महादेव हुलजुते, अॅड.अमित देशपांडे, डॉ.सुरेंद्र कलंत्री, डॉ.विवेक पालवनकर, सौ.जयश्री रायते, विश्वंभर थिगळे आणि प्रा.ज्योतीश्वर भालेराव, सुमुख गोविंदपूरकर यांनी विविध शाखांमध्ये उपस्थित राहून शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी अनेक मान्यवरांनी स्वतः रक्तदान करून समाजापुढे प्रेरणादायी आदर्श निर्माण केला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बँकेचे अध्यक्ष डॉ.सुभाष जोशी, उपाध्यक्ष डॉ.लक्ष्मीकांत पारनेरकर, संचालक अॅड.अमित देशपांडे, सीईओ राजेश कुलकर्णी, डेप्युटी सीईओ प्रल्हाद राजुरीकर, सरव्यवस्थापक महेश पारगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शाखाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या रक्तदाते, मान्यवर, नागरिक आणि विविध रक्तपेढींच्या सहकाऱ्यांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले. सामाजिक उत्तरदायित्व जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.





Comment here