माजलगाव : येथील नवनाथ नगर परिसरातील दीपक महादेव महाजन या युवकाचा भीषण अपघातानंतर जीव धोक्यात आला होता. मात्र नागरिकांच्या एकजुटीने आणि आर्थिक मदतीमुळे त्याच्यावर यशस्वी उपचार होऊन त्याला नवजीवन मिळाले.
माजलगाव शहरातील नवनाथ नगर परिसरातील दीपक महादेव महाजन या युवकाला गंभीर अपघातानंतर सर्व नागरिकांच्या एकजुटीमुळे व मदतीमुळे जीवदान मिळाले आहे. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात दीपक गंभीर जखमी झाला होता. डॉक्टरांनी त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगितले होते. त्यात वडिलांचे छत्र आधीच हरपलेल्या दीपकवर आई, आजी आणि बहिणीची जबाबदारी होती. बीड येथे शिक्षण घेत असताना तो घर खर्चासाठी पार्ट-टाईम नोकरीही करत होता. मात्र अपघातानंतर संपूर्ण कुटुंबावर संकट कोसळले. उपचारासाठी लागणारा प्रचंड खर्च पाहता कुटुंबीय हतबल झाले होते. शासनाच्या योजनांमधून काहीसा दिलासा मिळाला, तरीही औषधोपचारांचा खर्च परवडत नव्हता. यावेळी नवनाथ नगरमधील महिला मंडळ आणि स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत समाजाकडे मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत समाजातील दानशूर व्यक्तींनी उदारपणे मदत केली आणि दीपकच्या उपचारासाठी आवश्यक निधी उभा राहिला. यामध्ये ज्ञानेश्वर मेंडके यांचे विशेष योगदान राहिले. त्यांच्या सहकार्यामुळे कुटुंबाला मोठा आधार मिळाला. सध्या दीपकच्या प्रकृतीत सुमारे ७० टक्के सुधारणा झाली असून तो घरी परतला आहे. दीपकच्या कुटुंबीयांनी समाजाने दिलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत ‘आजही माणुसकी जिवंत’ असल्याची भावना व्यक्त केल्या.



Comment here