समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहा : नगरसेवक दीपक मेंडके
माजलगाव : “जन्मगाव मांडवगण… चलो मांडवगण… जय कुळो” हे ब्रीदवाक्य घेऊन राष्ट्रसंत कैकाडी महाराजांची जयंती त्यांचे जन्मगाव मांडवगण, ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने बीड जिल्हा तसेच माजलगाव शहर व तालुक्यातील कैकाडी समाज बांधवांनी गुरूवार, दिनांक 26 मार्च 2026 रोजी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजलगाव नगरपालिकेचे नगरसेवक दीपक मेंडके यांनी केले आहे.
मांडवगण येथे अनेक वर्षांपासून संत कैकाडी महाराजांची जयंती भक्तिभावाने साजरी केली जाते. या उत्सवात त्यांच्या सामाजिक व अध्यात्मिक कार्याचा उलगडा करून विविध विषयांवर प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केले जातात. ग्रामस्थ, पंचक्रोशीतील भाविक व कैकाडी समाज बांधवांच्या सहकार्याने येथे भव्य मंदिर उभारणी व परिसर सुशोभीकरणाचे काम सुरू आहे.
यंदाच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन, सामुदायिक भजन-आरती, तसेच प्रसाद वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) व इतर स्पर्धा परीक्षांत यश मिळवलेल्या समाज बांधवांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच नवनिर्वाचित नगरसेवक, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. या उपक्रमशिल व प्रेरणादायी कार्यक्रमासाठी अधिकाधिक समाज बांधवांनी उपस्थित राहून जयंती उत्सव यशस्वी करावा, असे आवाहन नगरसेवक दीपक मेंडके यांनी केले आहे.



Comment here