माजलगाव : मेन रोडचा महाराजा म्हणून नावलौकिक असलेले युवाशक्ती गणेश मंडळाने यंदाही गणेशोत्सवात आकर्षक आणि आगळ्यावेगळ्या संकल्पनेची परंपरा कायम ठेवत २५ फूट उंच विष्णुरूपी गणेशमूर्तीची उभारणी केली आहे. बीड जिल्ह्यातील सर्वात उंच गणेशमूर्तींपैकी एक म्हणून या मूर्तीचे भाविकांचे लक्ष वेधले जात असून, गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडळाने यंदाही विविध सामाजिक उपक्रम आणि स्पर्धांचे आयोजन केले आहे.
मेन रोड, माजलगाव येथे दरवर्षी नावीन्यपूर्ण आणि आकर्षक गणेशमूर्ती उभारण्याची परंपरा युवाशक्ती गणेश मंडळाने जोपासली आहे. यंदा विष्णुरूपी गणेशमूर्ती साकारण्यात आली असून, मूर्तीची भव्यता आणि आकर्षक सजावट हे गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. गणेशोत्सव केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने मंडळाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर, आरोग्य शिबिर, मूकबधिर शाळेत उपक्रम तसेच गोशाळेत चारा वाटप करण्यात येणार आहे.
महिलांसाठी ‘खेळ रंगला पैठणीचा’ अर्थात होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला, रांगोळी, निबंध आणि वेशभूषा स्पर्धा, तर भक्तिमय वातावरणासाठी अभंग गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सामाजिक उपक्रमांच्या मालिकेतील महत्त्वाचा उपक्रम म्हणून गुरूवार, १७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मेन रोड, माजलगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
‘जीवन वाचवा, समाजासाठी पुढे या’ आणि ‘चला… रक्तदान करून मानवतेचा धर्म जपूया!’ या संदेशातून नागरिकांना रक्तदानासाठी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक बांधिलकी, आरोग्यविषयक जनजागृती आणि विविध कलागुणांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न मेन रोडचा महाराजा युवाशक्ती गणेश मंडळाकडून करण्यात येत आहे.




Comment here