आपला जिल्हा

‘पोस्टर’मधून उमटली फार्मसीच्या भविष्याची दिशा!

गुरूकृपा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीची सहावी राज्यस्तरीय पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा उत्साहात; ९४ संघांचा सहभाग

माजलगाव : विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना देतानाच वैज्ञानिक दृष्टिकोन, सादरीकरण कौशल्य आणि नाविन्यपूर्ण कल्पनांना राज्यस्तरीय व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने गुरुकृपा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, माजलगाव यांच्या वतीने आयोजित सहावी राज्यस्तरीय पोस्टर प्रेझेंटेशन (भित्तीपत्रक सादरीकरण) स्पर्धा उत्साहात पार पडली. महाराष्ट्रातील विविध फार्मसी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी ९४ संघांच्या माध्यमातून सहभाग नोंदवत विविध वैज्ञानिक व संशोधनात्मक विषयांवरील पोस्टर्स प्रभावीपणे सादर केली.

प्रा.प्रकाश राजेभोसले आणि सौ.नंदिनी राजेभोसले यांच्या शुभ आशीर्वादाने रिबीन कापून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी संशोधन, औषधनिर्मिती, आधुनिक फार्मसी आणि आरोग्य क्षेत्रातील विविध विषयांवर आकर्षक व माहितीपूर्ण पोस्टर्स सादर केली. त्यांच्या सादरीकरणातून फार्मसी क्षेत्रातील भविष्यातील संशोधनाची दिशा आणि विद्यार्थ्यांची सर्जनशीलता प्रकर्षाने दिसून आली.

बक्षीस वितरण समारंभात फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.अमित बिंदू यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ.रंगनाथ गोळेकर तसेच पांडुरंग उगले यांची प्रमुख उपस्थिती होती. गुरूकृपा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ.यशवंत राजेभोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभवी लोखंडे व शितल गोपाळघरे यांनी केले, तर आभार प्रा.गणेश वाघमारे यांनी मानले.

बी.फार्मसी गटात के.टी.पाटील कॉलेज, धाराशिव येथील श्रद्धा साळगरे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. गुरूकृपा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, माजलगाव येथील सानिया पठाण हिने द्वितीय, तर डीजेपीएस कॉलेज, पाथरी येथील वैष्णवी काळे व सोनाली वाघमारे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना अनुक्रमे ७ हजार, ५ हजार आणि ३ हजार रुपये रोख धनादेश, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

डी.फार्मसी गटात दयानंद कॉलेज ऑफ फार्मसी, लातूर येथील शेख सानिया व शेख तस्मिया यांनी प्रथम क्रमांक पटकावला. चन्नबसवेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी, लातूर येथील पटेल शिफा व वैभवी धनश्री यांनी द्वितीय, तर आदित्य डिप्लोमा फार्मसी कॉलेज, बीड येथील गजानन गोरे व लबासे भागवत यांनी तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्यांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार आणि २ हजार रुपये रोख धनादेश, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. माजलगावसारख्या शहरात राज्यस्तरीय फार्मसी स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या संशोधनाला व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल शैक्षणिक क्षेत्रातून गुरुकृपा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य, प्राध्यापकवर्ग आणि सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comment here