आपला जिल्हा

मोंढा गणेश मंडळात साकारला प्राचीन गुफा व कालियामर्दनाचा भव्य देखावा

श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या शुभहस्ते उद्घाटन; भाविकांसाठी दररोज सायंकाळी देखावा खुला

माजलगाव : मोंढा गणेश मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त साकारण्यात आलेल्या ‘प्राचीन गुफा व कालियामर्दन’ या आकर्षक देखाव्याचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी मठाचे मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या शुभहस्ते या देखाव्याचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी उपनगराध्यक्ष सहाल चाऊस, जगदीश चांडक, तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत शेजुळ, श्री मंगलनाथ मल्टीस्टेटचे सीईओ रविंद्र कानडे, उद्योजक राहुल खुर्पे, नगरसेवक प्रशांत शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

गणेशोत्सवानिमित्त मोंढा गणेश मंडळाने भाविकांसाठी प्राचीन गुफा आणि भगवान श्रीकृष्णाच्या कालियामर्दन प्रसंगावर आधारित भव्य व आकर्षक देखावा साकारला आहे. देखाव्यामध्ये धार्मिक व पौराणिक प्रसंगाची आकर्षक मांडणी करण्यात आल्याने तो भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

हा देखावा दररोज सायंकाळी ५ ते रात्री १०.३० वाजेपर्यंत भाविक भक्तांसाठी खुला राहणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात जास्तीत जास्त भाविकांनी मोंढा गणेश मंडळास भेट देऊन या भव्य देखाव्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष प्रताप ललवाणी, उपाध्यक्ष कृष्णा चांडक तसेच सर्व सदस्यांनी केले आहे.

Comment here