आपला जिल्हा

गुरूंचा विरह सहन न झाल्याने सेवेकरी शिवचरणी लीन

माजलगाव मठाचे शिष्य विलासअप्पा शेटे यांचे निधन

माजलगाव : येथील सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी मठ संस्थानचे पूर्व मठाधिपती लिं.सद्गुरू तपोरत्नं प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे सेवेकरी आणि मठाचे निस्वार्थी सेवक विलास विठ्ठलअप्पा शेटे (वय ४५) यांचे आपल्या गुरूचा विरह सहन न झाल्याने हृदयविकाराचा त्रास होऊन दुपारी १.४० वाजता निधन झाले. तपोरत्नं माजलगावकर महाराजांचा समाधी सोहळा उरकल्यानंतर काही वेळातच विलासअप्पा शेटे यांनी जगाचा निरोप घेतला. आज शनिवार, दि.१० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांचा समाधीविधी येथील वीरशैव रूद्रभूमीत करण्यात आला.

शुक्रवारी दुपारी १ वाजता माजलगाव मठाचे मठाधिपती सद्गुरू श्रीगुरू तपोरत्नं प्रभुपंडिताराध्य शिवाचार्य महाराज शिवचरणी लीन झाले. त्यांचा समाधी सोहळा आज शनिवार, दि.११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता माजलगाव मठामध्ये करण्यात आला. हा समाधी सोहळा पार पडल्यानंतर विलासअप्पा शेटे यांच्या छातीत त्रास सुरू झाला. तातडीने त्यांना येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले असता येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गेल्या पंधरा वर्षांपासुन विलासअप्पा शेटे कुठल्याही अपेक्षेविना निस्वार्थ भावनेने माजलगाव मठाची सेवा करीत होते. त्यांची काम करण्याची हातोटी आणि विलक्षण चपळता माजलगावकर महाराजांना भावल्याने अगदीच कमी काळात ते त्यांचे विश्वासू सेवेकरी झाले. त्यांच्या अशा अचानक जाण्याने सम्रग वीरशैव समाज पुन्हा एकदा शोकसागरात बुडाला असून केवळ दोनच दिवसात हा दुसरा मोठा धक्का या समाजाला सहन करावा लागला आहे. शनिवार, दि.११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता त्यांचा समाधीविधी येथील वीरशैव रूद्रभूमीत अत्यंत शोककूल वातावरणात करण्यात आला. शेटे कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात वर्तमान माध्यम समूह सहभागी आहे.


तपोरत्नं माजलगावकर यांच्या समाधीविधी सोहळ्याप्रसंगी विलासअप्पा शेटे, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत केली गुरूंची सेवा.

Comment here