आपला जिल्हा

समाजकल्याणासाठी माजलगावकर महाराजांचे अमूल्य योगदान

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा शोकसंदेश

माजलगाव : तपोरत्नं प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य माजलगावकर महाराज यांच्या निधनाने समाजाची मोठी हानी झाली असून त्यांनी सर्व समाजाच्या कल्याणासाठी मोठे योगदान दिले. माझे आणि माजलगावकर महाराजांचे कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध होते, असे प्रतिपादन शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आपल्या शोकसंदेशात केले आहे.

माजलगाव येथील सद्गुरू मिस्कीन स्वामी संस्थानचे मठाधिपती तपोरत्नं प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांच्या निधनाचे वृत्त समजताच माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी माजलगाव येथे धाव घेवून महाराजांच्या पार्थिव देहाचे अंत्यदर्शन घेतले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत शिवसेना बीड जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव, सोमनाथआप्पा साखरे, विश्वनाथ स्वामी, उपजिल्हाप्रमुख रामराजे सोळंके, अभयकुमार ठक्कर, अतुल दुबे, रमेश चौंडे, अतुल उगले, तुकाराम येवले, भगीरथ तोडकरी आदींची उपस्थिती होती. पुढे आपल्या शोकसंदेशात चंद्रकांत खैरे म्हणाले, माजलगावकर महाराजांच्या निधनामुळे माझ्या कुटुंबियांवर दुःखाचे आभाळ कोसळले आहे. त्यांच्या जाण्याने खूप वेदना होत आहेत. माझी आणि महाराजांची खूप जुनी ओळख होती. त्यांच्या आणि माझे कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. माझ्या राजकीय जडणघडणीला महाराजांचे आशीर्वाद लाभलेले होते, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली.

‘माझा धार्मिक आधार गेला’

तपोरत्नं प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य माजलगावकर महाराज माझे धार्मिक गुरू होते. माझ्यासारख्या राजकारण्याचा शिवाचार्य महाराज धार्मिक आधार होते. त्यांच्या जाण्याने समाजासह माझी वैयक्तिक हानी झाली आहे, अशी प्रतिक्रिया वर्तमानशी बोलताना माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली. प्रतिक्रिया देताना खैरे यांचे डोळे पाणावले होते. तपोरत्नं माजलगावकर महाराज यांच्या दुखःद निधनामुळे समस्त वीरशैव लिंगायत समाज पोरका झाला आहे, असेही खैरे म्हणाले.

Comment here