साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे गौरवोद्गार
माजलगाव : दुष्काळग्रस्त भागात साखर कारखाना सुरू करून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात प्रकाश पाडण्याचे काम लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याने केले आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी शुक्रवारी काढले. ते तेलगाव येथे सोळंके कारखान्याच्या बाॅयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रमात बोलत होते.
तेलगाव येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२१-२२ या ३० व्या बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रम शुक्रवार, दिनांक ८ ऑक्टोबर रोजी दुपारी २:३५ वाजता झाला. यावेळी कारखान्याचे संचालक शिवाजीराव बडे व त्यांच्या सुविद्य पत्नी जनाबाई बडे या उभयतांच्या हस्ते बॉयलर पूजन करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आमदार प्रकाश सोळंके हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड हे होते. व्यासपीठावर चेअरमन धैर्यशील सोळंके, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोकराव डक, जिल्हा परिषदेचे सभापती जयसिंह सोळंके, सभापती कल्याण आबुज, माजी सभापती जयदत्त नरवडे आदीसह कारखाना संचालक उपस्थित होते. यावेळी उपस्थीतांना आपल्या मार्मीक शब्दात मार्गदर्शन करताना साखर आयुक्त गायकवाड म्हणाले की, साखर उद्योगाचे माध्यमातुन मागच्या वर्षी आणि या वर्षी २५ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याचे काम केले. आजच्या तारखेला जर बघीतले तर पंजाब, गुजरात, उत्तरप्रदेश आदी राज्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पैसे येणे बाकी आहे. त्या तुलनेने आपल्या राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती गत तीन वर्षांपासून चांगली आहे. यावर्षी १ लाख हेक्टरने ऊस लागवड वाढ होत आहे. कारण नाशिकमध्ये द्रांक्षे, कांदयाला फटका बसला. तसेच इतरत्रही विविध कारणांनी शेतकऱ्यांना फटका बसला. त्यामुळे बहुतांश शेतकरी आता ऊस लागवडीकडे वळत आहे असे सांगत राज्यात १९५ साखर कारखान्यांपैकी ३५ साखर कारखाने चांगल्या स्थितीत नाहीत. आपल्या कारखान्याचे नाव चांगले असल्यानेच मी येथे आलो. या कारखान्याने साखर उत्पादना सोबतच उपपदार्थ उत्पादन घेत चांगली प्रगती केली असून या कारखान्याने इथेनॉल दिशेने केलेली प्रगती खरोखरच स्तुत्य असुन इथेनॉलच्या माध्यमातुन या कारखान्याची यशस्वी वाटचाल होतेय. मराठवाडयातील शेतकऱ्यांच्या जिवनामध्ये नवा प्रकाश पाडण्यासाठी हा एक नंबरचा कारखाना असुन यासाठी हा कारखाना पुढाकार घेईल अशी माझी खात्री आहे. आमदार प्रकाश सोळंके व धैर्यशील सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली हा कारखाना निश्चीतच शेतकऱ्यांचे हित जोपासत असल्याचे गौरवोद्गारही गायकवाड यांनी यावेळी काढले. तर कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात आमदार प्रकाश सोळंके म्हणाले की, यंदाचा गळीत हंगाम मोठा असून आपल्या कार्यक्षेत्रात ३५ लाख मे.टन ऊस उपलब्धता होत असून आपल्या कारखान्याचे ऊस गाळपाचे उधिष्ठ १२ लाख मे.टन ठेवले आहे. यावर्षीचा हंगाम १५ ऑक्टोबर, २०२१ ते १५ जून, २०२२ पर्यंत चालेल अशी शक्यता असुन यंदा इथेनॉल निर्मीतीचे वाढीव प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वीत होणार आहे. मागच्या दोन-तीन वर्षांच्या केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या धोरणातुन साखरेचे उत्पन्न कमी करायचे आणि इथेनॉल उत्पादन वाढवावयाचे आहे. त्यामुळे यावर्षी साडेचार कोटी लिटर इथेनॉल निर्मीती करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन धैर्यशील सोळंके यांनी करून त्या कारखान्याच्या प्रगतीचा व येणाऱ्या हंगामाचा आढावा त्यांनी घेतला. कार्यक्रमास परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी, कामगार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार कारखान्याचे संचालक प्रकाश शिंदे यांनी केले.
Comment here