इतिहासात पहिल्यांदाच अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवाराला मान
माजलगाव : तालुक्यातील आबेगाव सेवा सहकारी सोसायटीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. सेवा सोसायटींच्या इतिहासात पहिल्यांदाच चेअरमनपदाचा मान अनुसूचित जाती प्रवर्गातील कैलास भानुदास शिनगारे यांना मिळाला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत शेजुळ यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली शिनगारे यांच्याकडे चेअरमनपदाची धुरा सोपविली.
माजलगाव तालुक्यात सध्या विविध सेवा सहकारी सोसायटींच्या निवडणुका जोरात सुरू आहेत. जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत शेजुळ यांचा बालेकिल्ला असलेल्या आबेगाव सेवा सहकारी सोसायटीवर निर्विवादपणे राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व सिद्ध केले आहे. १३ संचालक असलेल्या सेवा सोसायटीच्या सर्व संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर चेअरमनपदी कैलास भानुदास शिनगारे यांचीही सर्व संचालकांच्या संमतीने बिनविरोध निवड करण्यात आली. या संचालक मंडळावर शिवाजी अनंतराव शेजुळ, बब्रुवान भगवानराव शेजुळ, सुर्यकांत किसनराव शेजुळ, चंद्रकांत प्रकाशराव शेजुळ, भागवत प्रकाशराव शेजुळ, सुनिल गणपतराव शेजुळ, डाॅ.बंकट शेषेराव शेजुळ, प्रमोद कल्याणराव शेजुळ, सौ.शारदा अच्युतराव शेजुळ, सौ.सुषमा संजय शेजुळ, दत्ता रामभाऊ काळे, लक्ष्मण दिगाबुवा पुरी आदींची वर्णी लागली आहे. सर्व संचालक मंडळाचे चंद्रकांत शेजुळ यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
चंद्रकांत शेजुळ यांची ठरली निर्णायक भूमिका
माजलगाव तालुक्यात विविध ४८ सेवा सहकारी सोसायट्या कार्यान्वित आहेत. ग्राम पातळींवर सोसायटींच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत. सेवा सहकारी सोसायटींच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच आबेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून कैलास भानुदास शिनगारे या अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवाराला चेअरमनपदी स्थान दिलेले आहे. सोसायटी निवडणुकीत कोणतेही आरक्षण नसते. त्यामुळे कैलास शिनगारे यांच्या रूपाने पहीले चेअरमन मिळाले आहेत, अशी प्रतिक्रिया जनमानसांमधून उमटत आहे. कैलास शिनगारे यांना चेअरमन करण्यासाठी चंद्रकांत शेजुळ यांच्यासह सर्व संचालक मंडळाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली.
‘विकासाभिमुख नेतृत्वावरील विश्वास दृढ’
माजलगाव तालुक्याचे भाग्यविधाते आमदार प्रकाश सोळंके यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाखाली विविध सेवा सहकारी सोसायट्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात राष्ट्रवादीची विचारसरणी रूजलेली आहे. आबेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी कैलास शिनगारे यांची निवड झाली याबद्दल समाधान वाटत आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे बीड जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रकांत शेजुळ यांनी दिली.
Comment here