आपला जिल्हा

लोकनेते सुंदररावजी सोळंके कारखाना बायोगॅस प्रकल्प उभारणार

वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रकाश सोळंके यांची घोषणा

तेलगाव : इतर उपपदार्थांच्या निर्मितीसोबत लोकनेते सुंदररावजी सोळंके कारखान्यातून बायोगॅसचे उत्पादन करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पुढील वर्षीपासून कार्यान्वित होणार असल्याची घोषणा करत ऊस उत्पादकांना नेहमीच जास्तीचा ऊस भाव देत असून पुढील वर्षी यावर्षीपेक्षा जास्त भाव देण्याचा प्रयत्न करणार असल्याची घोषणा माजी मंत्री तथा आमदार प्रकाश सोळंके यांनी केली. कारखान्याकडील एक हजार शेअर्स तात्काळ विक्रीसाठी खुले केले असून शेतकऱ्यांनी शेअर्स खरेदी करावे तसेच ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी आपल्या ठेवी इतरत्र न ठेवता कारखान्याच्या खात्यात ठेवाव्यात त्यावर व्याज घ्यावे, असे आवाहन सोळंके यांनी गुरूवारी वार्षिक सर्वसाधारण सभेत केले.

तेलगाव येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरूवार, दिनांक 29 रोजी झाली, त्यात कारखान्याचे अध्यक्ष धैर्यशिल सोळंके यांनी अहवाल वाचन करत विषय पत्रिकेनुसार सर्व विषय सभेसमोर मांडून सर्व सभासदांनी संमतीने सर्व विषय मंजूर केले. याप्रसंगी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन करताना आमदार प्रकाश सोळंके म्हणाले की, कारखान्याने साखर उत्पादनावरच न थांबता इथेनॉल यासह इतर उपपदार्थांचे निर्मिती प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यामुळेच कारखान्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये वाढ होण्यास मदत होऊन ऊस उत्पादकांच्या ऊसाला इतरांच्या तुलनेत जास्तीचा भाव देण्यास मदत होत आहे. सध्या कार्यान्वित असलेल्या प्रकल्पा सोबत आपण सीएनजी उत्पादनाचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पातून उत्पादित होणारे सीएनजी हे वाहनांसाठी वापरले जाणार असून कारखान्यात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरसाठी त्याचा वापर होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा लिटर मागे 30 रूपये फायदा होणार आहे. या प्रकल्पात दररोज 11 मेट्रीक टन कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादीत होणार आहे. याचे तंत्रज्ञान भारतात उपलब्ध नसल्याने आपण हा प्रकल्प ऑस्ट्रीयामध्ये प्रत्यक्ष पाहिला असून त्याची सर्व माहिती घेतली असून यासाठीची सर्व सामुग्री ऑस्ट्रीयातून आणण्यात येणार आहे. पुढील वर्षीपासून हा प्रकल्प कार्यान्वित होईल. मागच्या वर्षी इथेनॉलचे जास्तीचे उत्पादन 2.94 कोटी लिटर केले असून पुढील वर्षी पाच कोटी लिटर इथेनॉल निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच वीज निर्मितीतही आपला उच्चांक असून उत्पादीत वीज आपण वीज वितरण कंपनीस देत असल्याचे सांगून उद्यापासून आपल्या कारखान्याचे एक हजार शेअर्स विक्रीसाठी खुले केले असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेअर्स खरेदी करावेत. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या उज्वल आर्थिक प्रगतीसाठी कारखान्याकडे ठेवी जमा कराव्यात. कारखान्याकडे ठेवी ठेवल्यास आकर्षक असे प्रती वर्ष व्याज अदा करणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली ठेव रक्कम इतरत्र न ठेवता आपल्या हक्काच्या कारखान्यात ठेवावी, असे आवाहन करत आगामी तीन महिन्यात आपल्या कारखान्यास 50 कोटीच्या ठेवी जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचेही सोळंके यांनी यावेळी सांगितले. या वार्षिक सभेस कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद, जयसिंग सोळंके, रवि सोळंके, प्रशांत सावंत, उमाकांत सोळंके, बाळासाहेब शिंदे, लक्ष्मणराव पौळ, माजी संचालक नरहरी निर्मळ, शिवाजीराव शेजुळ, शिवप्रसाद खेत्री, रामप्रभु साळुंके, लालासाहेब तिडके, व्यंकटराव मोरे, मोकींदराव चव्हाण, भगवानराव शेळके यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार उपस्थित होते.

Comment here