संगम दलीत वस्ती दोन महिन्यांपासून अंधारात; भीम आर्मी संघटनेचे आजपासून आमरण उपोषण
तेलगाव : धारूर तालुक्यातील संगम येथील दलीत वस्ती गेल्या दोन महिन्यांपासून अंधारात आहे. याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. याप्रश्नी जाब विचारण्यासाठी मंगळवार 11 ऑक्टोबर रोजी सकाळी वीज वितरण कंपनीच्या तेलगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर भीम आर्मी संघटना आणि दलीत वस्तीतील नागरिक आमरण उपोषणाला बसणार आहेत.
धारूर तालुक्यातील संगम येथील दलीत वस्ती गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण अंधारात आहे. दलीत वस्तीतील नागरिकांनी वीज बिलेही भरलेली आहेत. मात्र मनमानी कारभाराचा कळस गाठल्याने संगम येथील दलीत वस्तीवर अन्याय होत आहे. या अन्न्यायाला वाचा फोडण्यासाठी भीम आर्मी संघटना आक्रमक झाली आहे. जवळपास 20 कनेक्शन असलेला डीपी का बंद आहे हा जाब दलीत वस्तीतील नागरिक आंदोलनातून विचारणार आहेत.
केवळ विकासाच्या गप्पा
एकिकडे शासन-प्रशासन केवळ विकासाच्या गप्पा मारत आहे. दुसरीकडे वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण वस्ती अंधारात आहे. हा घोर अन्न्याय आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते अविनाश गवळी यांनी दिली आहे. याला वाचा फोडण्यासाठी मंगळवार 11 ऑक्टोबर रोजी सकाळपासून बेमुदत आमरण उपोषण करण्यात येत आहे. याबाबतचे निवेदन भीम आर्मी संघटना धारूर तालुक्याच्यावतीने देण्यात आले आहे. हे आंदोलन भीम आर्मी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ मायंदळे यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात येणार आहे. निवेदनावर युवा नेते अविनाश गवळी, दीपक मस्के, कृष्णा कांबळे, संजय सौंदरमल, संभाजी सौंदरमल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Comment here