ह.भ.प.बाळू महाराज गिरगावकर यांचे आबेगाव येथे प्रतिपादन
माजलगाव : वारकरी संप्रदाय माणुसकीची शिकवण देणारा आहे. वारकरी संप्रदायाने समाज जोडण्याचा विचार दिला. त्यामुळे वारकरी संप्रदायाचे वैभव असेच टिकवून ठेवा, असे आवाहन ह.भ.प.बाळू महाराज गिरगावकर यांनी शनिवार, दि.३ डिसेंबर रोजी आबेगाव येथे केले. दिवंगत प्रकाशराव शेजुळ यांच्या गंगापूजन कार्यक्रमात गिरगावकर यांची कीर्तन सेवा झाली, याप्रसंगी उपस्थितांना प्रबोधन केले.
ह.भ.प.बाळू महाराज गिरगावकर म्हणाले, थोरामोठ्यांचे, आई-वडीलांचे आशिर्वाद असल्याशिवाय पुढच्या पिढीच्या हातून सत्कार्य होत नाही. दिवंगत प्रकाशराव शेजुळ यांनी त्यांच्या सुपुत्रांना संस्कार दिले, त्यातून ते घडले. घरातील कर्त्या माणसाचे संस्कार खूप मोलाचे असतात. हा संस्काराचा परिपाक वारकरी संप्रदाय घडवून आणतो म्हणून वारकरी संप्रदायाची नाळ कदापीही तोडू नका. जनसामान्य वारकऱ्यांनी आपल्या निस्सिम भक्तीच्या जोरावर भागवत धर्माची पताका फडकवत ठेवली आहे. सर्वच संतमहात्म्यांनी माणूस जोडण्याचे महान कार्य केले आहे. तो महान वसा आपल्याला पुढे न्यायचा आहे, असेही आवाहन ह.भ.प.बाळू महाराज गिरगावकर यांनी केले.
आबेगाव येथील प्रगतिशील शेतकरी दिवंगत प्रकाशराव शेजुळ यांचे गेल्या २० नोव्हेंबर २०२२ रोजी निधन झाले. त्यांचा गंगापूजन कार्यक्रम शनिवारी आबेगाव येथे झाला. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील अबालवृध्द, महिला, शेजुळ कुटुंबियांचे नातलग, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. उभारलेल्या मंडपात दिवंगत प्रकाशराव शेजुळ यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून आदरांजली वाहिली. दिवंगत प्रकाशराव शेजुळ हे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत शेजुळ, आबेगावचे माजी सरपंच भागवतराव शेजुळ आणि प्रविण शेजुळ यांचे वडील होते.
Comment here