भगीरथ तोडकरी
माजलगाव : आंदोलन म्हणजे ज्ञानेश्वर मेंडके.. एकेकाळी माजलगावची शिवसेना म्हणजे ज्ञानेश्वर मेंडके. आंदोलनातून पुढे आलेले ज्ञानेश्वर मेंडके एक सच्चा कार्यकर्त्याचे रूप आहे. सर्वकाही स्वकष्टातून उभे करणाऱ्या ज्ञानेश्वर मेंडके यांचा आज 25 डिसेंबर रोजी वाढदिवस साजरा होत आहे. त्या निमित्ताने त्यांच्या व्यक्तीमत्वावर टाकलेला हा प्रकाशझोत.
शेतकरी वडीलांची पोटी जन्म घेतलेल्या ज्ञानेश्वर मेंडके यांना लहानपणापासूनच संघर्ष करावा लागलेला आहे. अशा परिस्थितीतही त्यांनी बी.ए.द्वितीय वर्षापर्यंत शिक्षण घेतलेले आहे. वयाच्या 10 व्या वर्षापासून ते शिवसेना या विचारधारेशी जोडलेले आहेत. थोरले बंधू राजेंद्र मेंडके, नरेंद्र मेंडके यांच्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जाज्ज्वल्य विचारांची ओळख झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा शिवसैनिक म्हणून माजलगाव तालुक्यात व्यापक संघटन उभारले. जवळपास 150 हून अधिक शाखा माजलगाव मतदारसंघात सुरू केल्या. तर माजलगाव शहरात 30 शाखा उभारून नवा विक्रम केलेला आहे. एकेकाळी माजलगाव मतदारसंघातील शिवसेना म्हणजेच ज्ञानेश्वर मेंडके हे समीकरण रूढ झालेले. पुढे सक्रीय राजकारणात काम करत असताना 1996 साली ते नगरसेवक म्हणून निवडून आले. 2006 पर्यंत शिवसेना तालुकाप्रमुख या पदावर कार्यरत होते. तालुकाप्रमुख पद स्विकारलानंतर कोणतेच लाभाचे पद घेणार नाही असा संकल्प केला आणि तो पुर्णत्वास नेला. ज्ञानेश्वर मेंडके यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत शिवसेना तालुकाप्रमुख, नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, दि सिध्देश्वर अर्बनचे संचालक अशी विविध पदे भूषविलेली आहेत. पुढे नगरपालिकेत 7 शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणले. त्यांनी जिल्हा परिषद निवडणूकही लढवलेली आहे.
गोपीनाथराव मुंडेंचा प्रभाव
दिंद्रुड पोलीस स्टेशनसमोर वडवणी तालुका व्हावा यासाठी जोरदार आंदोलन केले. या आंदोलनाची दखल थेट तत्कालीन विरोधी पक्षनेते गोपीनाथराव मुंडे यांनी घेतली. तब्बल 4 तास मुंडे ठाण मांडून होते. तेंव्हापासून मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू केले. आज मेंडके हे भाजपात आहेत. माजी मंत्री पंकजाताई मुंडे, खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे यांच्या आदेशानुसार त्यांचे अविरतपणे काम सुरू आहे.
अन् अमरनाथ यात्रेकरूंची झाली सुटका
सन 1995 साली ज्ञानेश्वर मेंडके हे अमरनाथ यात्रेला गेले असता जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे हजारों यात्रेकरू, तिथे अडकून पडले होते. त्यांची सुटका करण्यासाठी विविध राज्यांचे भाविक एकत्र करून आंदोलन केले. त्या आंदोलनाचे फलित म्हणून यात्रेकरूंना हेलिकॉप्टरव्दारे अन्नपदार्थ पाठविण्यात आले. लवकर सुटका होवून सर्व भाविक मायदेशी परतले. त्यामुळे आंदोलनाशिवाय पर्याय नाही, हे ज्ञानेश्वर मेंडके यांचे ब्रीद आहे.
Comment here