विशेष वार्ता

अध्यात्माला सामाजिक जोड देणारे अनंत जोशी

विजयकुमार कुलकर्णी

माजलगाव : टेंबे गणेश मंडळाच्या माध्यमातुन समाजोपयोगी विविध कार्यक्रमातुन केलेली समाजसेवा यातुन समाजात मिळविलेले आगळे-वेगळे स्थान यामुळे अनंतशास्त्री जोशी यांना माजलगाव तालुका पत्रकार संघाचा माजलगाव भूषण पुरस्कार जाहीर झाला याचा अभिमान असून आज दि.६ जानेवारीला दर्पण दिनी या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

अनंत लक्ष्मीकांतबुवा जोशी यांचा जन्म एका सर्वसाधारण कुटुंबात ९ एप्रिल १९७७ मध्ये झाला. प्राथमिक, माध्यमिक शिक्षण घेतले परंतु पदवीपर्यंतचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यांचे आजोबा मल्हारबुवा जोशी हे वेदशास्त्र संपन्न होते तर पंजोबा राजारामबुवा, व गणपतबुवा ज्योतिष्य व वैदीक परंपरा यात विद्वान होते. त्यांची वाणी सिध्द होती ते सांगतील, बोलतील ते सिध्द होत, सत्यात उतरत असे. अनंतशास्त्रींचे वडील वे.शा.सं.कै.लक्ष्मीकांतबुवा, काका कै.सुर्यकांतबुवा, कै.मधूकरबुवा यांनाही ज्योतिष्याचे एका प्रकारचे वरदान होते. त्यांचेच बाळकडू माजलगाव भूषण असलेले अनंतशास्त्री जोशी यांच्यात आजही पहायला मिळते. ज्योतिष्य व वैदीक शास्त्रावर त्यांचे असलेले प्रभुत्व आणि समाजाविषयी असलेली कार्यतत्परता वाखाण्याजोगी आहे. बालपणीच वडिलांचे छत्र हरवले. त्यानंतर त्यांचा सांभाळ आजोबांनी केला. या काळात अनंतशास्त्रींना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. बीकट परिस्थितीशी दोन हात केले. या सर्व कामी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.कल्पना जोशी यांची मोलाची साथ. आयुष्याची विस्कटलेली घडी सावरण्यासाठी मित्रपरिवार धावून आला तर जोशी घराण्यास ज्योतिष्याचे वरदान आहे. त्याचा प्रसार, प्रचार करा व यातुन समाजाचा फायदा करून द्या असे पत्नी सौ.कल्पना जोशी यांनी कानमंत्र दिला. या प्रेरणेतुन शास्त्रींनी सुरूवात केली व त्यांच्या जीवनास कलाटणीच मिळाली ती माजलगाव भूषण पर्यंत पोहोचली. कोरोना सारख्या भयानक संकटात टाळेबंदी असतांना निराधार, गरजू व्यक्तींना टेंबे गणेश मंडळांच्या माध्यमातून केलेली मदत ज्यामध्ये ३९ दिवस अन्नदान, रक्तदान शिबीरे, शेतकरी बांधवांना मदत, मार्गदर्शन, वैयक्तीक स्वरूपात मदतीचा आधार देत सहकार्य केले. ब्राम्हण समाजास व समाजातील इतर घटकांना वेगवेगळ्या स्वरूपातील आर्थिक मदत, सोबत असणाऱ्या पूरोहितांना स्वखर्चातून चार धाम दर्शन या कामाची पावती म्हणून २०२० मध्ये जिल्हा पूरोहित महासंघाच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली. टेंबे गणपती मंदिर, शंकरानंद मठ, ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिर यासह विविध देवस्थानाचा जिर्णोध्दार, इतर छोटे-मोठे काम यासाठी सढळ हाताने मदत. नवरात्रोत्सव, विवीध गणेश मंडळांना मदत, सहकार्य व मार्गदर्शन, वृक्षारोपण असे समाजापेयोगी राबविलेले कार्यक्रम. त्यांच्या या कार्याची दखल माजलगाव तालुका पत्रकार संघाने घेत त्यांना माजलगाव भुषण पुरस्कार जाहिर केलेला असुन दि.६ जानेवारी २०२३ रोजी मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

अनंतशास्त्री जोशी यांनी राबविलेले सामाजिक उपक्रम

शतकापेक्षा अधिक वर्षांची परंपरा असलेल्या ढुंढीराज टेंबे गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी २०२६ ला अनंतशास्त्री जोशी यांची निवड झाली. त्यांनी याकाळात पंतप्रधान निधीस एक लाख रूपये, सामुहिक विवाह प्रित्यर्थ पन्नास हजार रूपये, शासनास दुष्काळ निधी-एकवीस हजार, माजलगाव धरणात मदत कार्य करतांना बुडून दुर्देवी मृत्यु झालेल्या कै.राजशेखर मोरे यांच्या कुटूंबीयांन एकविस हजार रूपये, गणेशोत्सव काळात स्वातंत्र्य लढ्यातील प्रसंगाचे चित्र प्रदर्शन, १९४७ ते २०२२ पर्यंत भारताच सर्व कार्यक्षेत्रातील प्रगतीचे चित्रप्रदर्शन, होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबविलेले आहेत.

(लेखक महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील सेवानिवृत्त पर्यवेक्षक आहेत.)

Comment here