महा-राष्ट्र

परभणीतील शिवपुराण कथेची जय्यत तयारी

ओजस्वी वाणीतुन पंडित प्रदीप महाराज मिश्रा निरूपण करणार

परभणी : शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील पाथरी रस्त्यावर असलेल्या लक्ष्मी नगर येथील ६० एकर मोकळ्या जागेत शिवपुराणकथेचे आपल्या ओजस्वी वाणीतुन पंडित प्रदीप महाराज मिश्रा निरूपण करणार आहेत. या शिवपुराण कथेच्या निमित्ताने खासदार संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कथेच्या परिपुर्णते बाबत नियोजन करण्यात येत आहे़. भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही. यासाठी वेगवेगळ्या समितींच्या माध्यमातून चोख नियोजन करण्यात येत आहे.

या कथेचे आयोजन १३ ते १७ जानेवारी करण्यात आले आहे. त्या निमित्ताने खासदार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी कामाला लागले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या कथेचे आयोजन करण्यात आले आहे़ या कथेसाठी एक ते दोन लाख भाविक उपस्थित राहतील असा अंदाज आहे. कथेसाठी १६५ बाय ७०० स्क्वेअर फुटाचा मंडप उभारण्यात येत आहे. जर्मन टेक्नॉलॉजीचा हा डोम असून त्यात एकही खांब नाही हे त्यामागील वैशिष्ट्य आहे. कथेच्या निमित्ताने संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.

बाहेर गावाहून येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्थेवरही विशेष भर देण्यात येत आहे. परभणी जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा तसेच परराज्यातूनही भाविक शिवपुराण कथेचे श्रवण करण्यासाठी परभणीत येणार आहेत. पाथरी शहरातून कथेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी चैतन्य नगरी, समर्थ नगर संचारेश्वर नगरी शिवांशवाडी, फ्रुट मार्केट समोरील पटांगण या ठिकाणी तर जिंतूर येथून येणाऱ्या भाविकांसाठी नवरचना प्रतिष्ठानच्या पाठीमागील २५ एकर जागेवर पार्किंग व्यवस्था उभारण्यात आली आहे़ परभणीतील वाहनांसाठी ज्ञानोपासक महाविद्यालय, शेळके यांचा मळा तसेच शहाणे सराफ यांच्या शेतातील जागा, रेणुका नगरी या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.

त्याचबरोबर १५० कॅमेराच्या माध्यमातून संपूर्ण परिसराची सुरक्षा यंत्रणा देखरेखीखाली राहणार आहे. ३० एलईडीच्या माध्यमातून भाविकांना कथा पाहता/ऐकता येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात आली असून आपत्कालीन स्थितीसाठी पाच रूग्णवाहिका तैनात करण्यात आलेल्या आहेत. भाविकांसाठी मोफत पाणी तसेच इतर साहित्यांची व्यवस्था करण्यात येत असून जवळपास १५० दुकाने थाटण्यात येणार आहेत. यात धार्मिक साहित्य विक्री, पूजा साहित्य आणि अयोध्या तसेच मथुरा येथील स्वादिष्ट अशा मिठाई आणि भोजन सामग्रीचे दुकाने थाटण्यात येणार आहेत.

परभणी शहरातील भाविकांसाठी बसस्थानक आणि रेल्वेस्टेशन येथून कथा मंडपात पर्यंत येण्यासाठी सोमनाथ धोत्रे आणि मित्र मंडळाच्या माध्यमातून ऑटो रिक्षाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. चार वैद्यकीय कक्ष तयार होत असून स्वच्छतागृह आणि इतर यंत्रणा देखील सज्ज ठेवण्यात येत आहेत. येणाऱ्या महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी शंभर महिला बाऊन्सर मदतीला राहणार आहेत. या सर्व कामावर खासदार संजय जाधव हे जातीने लक्ष देत असून कार्यकर्त्यांच्या मदतीने कार्य पूर्ण करून घेत आहेत. शिवकथा आयोजनामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि चैतन्याचे वातावरण दिसून येत आहे.

Comment here