पालघरचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते गौरव
बीड : धारूर तालुक्यातील चाटगावचे भूमिपुत्र, पालघर जिल्ह्यात पोलिस दलात कार्यरत शंकर तुकाराम सांगळे यांना प्रशंसनीय सेवेबद्दल पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र दि.1 मे रोजी महाराष्ट्र दिनी प्रदान केले.
पालघरचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पोलिस हवालदार शंकर सांगळे यांचा पोलिस पदक प्रदान करून सन्मान करण्यात आला. पालघर जिल्हयातील घोलवड पोलिस स्टेशनमध्ये सांगळे हे 2012 पासून पोलिस हवालदार या पदावर कार्यरत आहेत. आपल्या प्रशंसनीय सेवेबद्दल त्यांना पोलिस महासंचालकांचे पदक प्राप्त झाले. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी कोळगाव मैदान, पालघर येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. अतिशय प्रशंसनीय सेवेबद्दल पदक मिळाल्याबद्दल पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
चाटगावकरांची मान उंचावेल, असेच कार्य करणार : शंकर सांगळे
पोलीस पदक प्राप्त शंकर सांगळे हे धारूर तालुक्यातील चाटगाव येथील रहिवाशी आहेत. सामाजिक बांधिलकी जपत सांगळे यांनी पोलिस दलात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गडचिरोली सारख्या अतिशय दुर्गम अशा नक्षलग्रस्त भागातही त्यांनी सेवा बजावली आहे. पोलिस पदक प्राप्त झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना सांगळे यांनी सांगितले की, चाटगावकरांची मान अभिमानाने उंचावेल, असेच काम करणार असल्याची ग्वाही दिली.
Comment here