अतिक्रमणप्रश्नी आयएएस आदित्य जीवने अॅक्शन मोडवर
माजलगाव : शहरातील वाढत्या अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी तत्कालीन बीडचे जिल्हाधिकारी सुनिल केंद्रेकर यांच्या पावलावर पाऊल ठेवले असल्याच्या प्रतिक्रिया माजलगावकरांमधून उमटत आहेत. दरम्यान, आयएएस जीवने यांच्या कडक भूमिकेची सर्वत्र चर्चा होत आहे.
माजलगाव शहरातील बी अॅण्ड सी रोड, जुने बसस्थानक, जुना मोंढा, नवीन बसस्थानक या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती. नगरपरिषदेने ७२ तासांपूर्वी संबंधितांना नोटीस पाठवली होती. अतिक्रमणधारकांनी नोटीशीची दखल न घेतल्याने आयएएस अधिकारी तथा मुख्याधिकारी आदित्य जीवने यांच्या सुचनेवरून पोलिस बंदोबस्तात नगर परिषदेने मंगळवार, दि.२ मे रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. शहरातील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. या कारवाईचे माजलगाव शहरातील नागरीकांमधुन स्वागत होत आहे. माजलगाव शहरातील मुख्य रस्त्यासह मोक्याच्या ठिकाणी अतिक्रमण धारकांनी टपऱ्या, हादगाडे, पत्र्याचे शेड उभारून अतिक्रमण केले होते. या अतिक्रमाणामुळे पादचारी नागरिकांसह वाहतुकीसही मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत होती. याबाबत अनेक वेळेस माध्यमांनीही आवाज उठलला होता. वारंवार नागरिकांमधून ही या रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणाविरोधात ओरड होत होती. परंतु याबाबत प्रशासनाकडून कुठलीच कार्यवाही करण्यात येत नव्हती. दरम्यान, महिन्याभरापूर्वीच नगरपरिषदेचा प्रशासक पदभार घेतलेले मुख्याधिकारी आयएएस आदित्य जीवने यांनी या गंभीर बाबीकडे जातीने लक्ष दिले. या मोहिमेसाठी त्यांनी ७२ तासापूर्वी संबंधित अतिक्रमण धारकांना रितसर नोटीसा बजावल्या. परंतु अतिक्रमण धारकांनी त्या नोटीसांना दाद दिली नसल्याने स्वतः आयएएस जीवने आपल्या पूर्ण पालिका टीमसह पोलीस प्रशासनाची मदत घेत रस्त्यावर उतरले. व त्यांनी नवीन बसस्थानक, बी अॅण्ड सी रोडवरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. दरम्यान, यामुळे अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले आहे. यावेळी पुन्हा नव्याने अतिक्रमण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची आदित्य जीवने यांनी सांगितले आहे.
अतिक्रमण हटाव मोहीम तीन दिवस चालणार : आदित्य जीवने
अतिक्रमणाबाबत सर्व अतिक्रमण धारकांना मागील आठवड्यात नोटीसा बजावून अतिक्रमणे काढण्याचे आवाहन केले होते. परंतु ही अतिक्रमणे काढण्यात न आल्याने मंगळवार, दि.२ मे पासून अतिक्रमण हटाव मोहिम सुरू केली असून तीन दिवस ही अतिक्रमणे हटाव मोहिम सुरू राहणार असून शहरातील सर्व अतिक्रमणे हटविण्यात येतील. तसेच यापुढेही ही अतिक्रमणे केल्यास कारवाई करण्यात येईल, असे नगरपालिका प्रशासक आदित्य जीवने यांनी ‘वर्तमान’शी बोलताना सांगितले.
Comment here