आपला जिल्हा

विद्यार्थ्यांनी आपल्यातील वेगळेपण ओळखावे

प्रसिध्द व्याख्याते प्रा.गणेश शिंदे यांचे आवाहन; वडवणीत प्रचंड प्रतिसाद

वडवणी : शिक्षण हे आपल्या सर्वांगीण प्रगतीचे महाद्वार आहे. आपल्यातील वेगळेपण आपणच शोधून जगण्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघितले पाहिजे. तरच आपली प्रगती होईल. मुलांनो, आपल्यातील बलस्थाने आणि कमकुवतपणा ओळखून पुढील पाऊले टाका, असे आवाहन महाराष्ट्रातील प्रसिध्द व्याख्याते प्रा.गणेश शिंदे (पुणे) यांनी केले. ते वडवणी येथे चौंडेश्वरी कोचिंग क्लासेस आयोजित गुणवंतांच्या गुणगौरव सोहळ्यात बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडवणी नगर पंचायतीचे नगराध्यक्ष शेषेराव जगताप तर उपनगराध्यक्ष बन्सीधर मुंडे, प्रा.सत्यप्रेम मगर, नवनाथ म्हेत्रे, ह.भ.प.नवनाथ महाराज चिनके, नगरसेवक नागेश दीगे, हरिदास टकले यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना प्रा.गणेश शिंदे म्हणाले, कोणतेही क्षेत्र कमी अधिक नसते. कोणत्याही क्षेत्रात उतरा त्या क्षेत्रातील दिग्गज व्हा, प्रचंड मेहनत करा आणि यशस्वी व्हा, असा मोलाचा सल्ला शिंदे यांनी दिला. विविध क्षेत्रातील संधी तुम्हाला खुणावत आहे. त्या क्षेत्रात टाॅप होण्याचे स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, असेही शिंदे म्हणाले. चौंडेश्वरी कोचिंग क्लासेस आयोजित प्रा.गणेश शिंदे यांच्या व्याख्यानाला वडवणीकरांनी प्रचंड दाद दिली. प्रा.शिंदे यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी वडवणी शहर परिसरात आणि तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शेषेराव जगताप म्हणाले, वडवणी शहरात शैक्षणिक क्षेत्रात चौंडेश्वरी कोचिंग क्लासेसने अल्पावधीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. शैक्षणिक क्षेत्रात दर्जेदार कोचिंग क्लासेस म्हणून चौंडेश्वरीचा नावलौकिक होत आहे. याचा अभिमान वाटतो, असेही जगताप म्हणाले. प्रा.सत्यप्रेम मगर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थ्यीनींचा प्रा.गणेश शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरज टोंपे यांनी करून चौंडेश्वरी कोचिंग क्लासेसची भूमिका मांडली. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन अमोल राठोड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरज टोंपे, तुकाराम दिवटे, कृष्णा भुजबळ, मीरा आडे आदींनी परिश्रम घेतले.

Comment here