जंगम विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे : श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज
माजलगाव : येथील प्राचीन परंपरा असलेल्या वीरशैव लिंगायत समाजाचे प्रतिष्ठित अधिष्ठान असलेल्या सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी संस्थान मठाच्या वतीने जंगम विद्यार्थ्यांसाठी येत्या २० जुलैपासून वैदिक पाठशाळेचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी दिली.
माजलगाव संस्थान मठाचे यापूर्वीचे मठाधिपती शिवैक्य तपोरत्न प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज माजलगावकर यांचे वैदिक पाठशाळा सुरू व्हावी हे स्वप्न होते. त्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी वैदिक पाठशाळा सुरू करण्यात येत आहे. ही पाठशाळा येत्या २० जुलैपासून दैनंदिन सकाळ आणि संध्याकाळ या वेळेत होणार आहे. या वैदिक वर्गातून पूजापाठ, रूद्राभिषेक, वास्तुशांती इतर धार्मिकविधी शास्त्रोक्त पध्दतीने शिकविले जातील. धार्मिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण सुध्दा पूर्ण करण्यात येणार आहे. जंगम विद्यार्थ्यांसाठी मठाच्या वतीने निवास आणि भोजनाची सोय उपलब्ध केली जाणार आहे. या वैदिक पाठशाळेत इयत्ता पाचवी पुढील विद्यार्थ्यी सहभागी होऊ शकतात. या पाठशाळेत विद्यार्थ्यांना वैदिक अभ्यासक्रमाचे धडे रोहित स्वामी हे देतील. शिवैक्य तपोरत्न प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज माजलगावकर यांच्या प्रेरणेतून मठाचा आणि समाजाचा विकास झाला. याच विचाराचा धागा पकडून आपण पुढे जात आहे. शिवैक्य तपोरत्न प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज माजलगावकर यांचे शैक्षणिक विचार महान होते. त्यांच्या विचाराचा वारसा पुढे चालवण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करत असल्याची माहिती विद्यमान मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी दिली. या पाठशाळेचे ‘तपोरत्न वैदिक पाठशाळा’ असे नामकरण करण्यात आलेले आहे. तरी जंगम समाजातील इच्छुक विद्यार्थ्यांनी सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी संस्थान मठ, मठगल्ली माजलगाव (९३५६०२००१५, ८९७५९२६८०८) येथे संपर्क साधावा, असे आवाहन मठातर्फे करण्यात आले आहे.
Comment here