आपला जिल्हा

लोकनेते सुंदररावजी सोळंके कारखान्याची विश्वासार्हता सिद्ध

ज्येष्ठ संचालक प्रकाश सोळंके यांचे प्रतिपादन; सर्वसाधारण सभा उत्साहात

माजलगाव : लोकनेते सुंदररावजी सोळंके यांनी स्थापन केलेला हा साखर कारखाना नेहमी ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत असल्यानेच शेतकऱ्यांचा विश्वासास पात्र कारखाना ठरला असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आमदार प्रकाश सोळंके यांनी केले. गत हंगामातील जाहीर केलेल्या ऊस बिलाची उर्वरित रक्कम लवकरच ऊसउत्पादकांना अदा करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणाही यावेळी सोळंके यांनी केली. तर ऊसउत्पादकांच्या उसाची नोंद घेण्यासाठी कारखान्याने एक मोबाईल अॅप विकसित केल्याची माहिती चेअरमन विरेंद्र सोळंके यांनी दिली.

लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याची सन २०२२-२३ या आर्थिक वर्षांची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी दुपारी १ वाजता कारखाना कार्यस्थळावर माजी मंत्री तथा ज्येष्ठ संचालक आमदार प्रकाश सोळंके, धैर्यशील सोळंके यांच्या प्रमुख उपस्थितीत व चेअरमन विरेंद्र सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी व्यासपीठावर व्हाईस चेअरमन, जयसिंग सोळंके, सभापती जयदत्त नरवडे, संभाजी शेजुळ यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकनेते सुंदररावजी सोळंके यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांनी पूजन केले. यानंतर श्रध्दांजली ठरावाचे वाचन व्हाईस चेअरमन जयसिंग सोळंके यांनी केले. उपस्थित सभासद बांधवांना मार्गदर्शन करताना आमदार सोळंके म्हणाले की, हा कारखाना स्थापनेपासूनच ऊस उत्पादकांच्या हिताचा विचार करून शेतकऱ्यांच्या उसाला नेहमी रास्त भाव देत असल्याने शेतकऱ्यांचा या कारखान्यावर मोठा विश्वास असून या विश्वासावरच कारखान्याने अविरत ३१ वर्षे ऊस गाळप करून एक उच्चांक स्थापित केला. या कारखान्याने साखर उत्पादना बरोबरच इतर उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प कार्यान्वीत केले. या प्रकल्पातून निर्मिती होणाऱ्या उपपदार्थांचा शेतकऱ्यांच्या उसाला वाढीव भाव देण्यास मोठा फायदा झालेला आहे. या कारखान्याच्या तुलनेत आपल्या जिल्ह्यातील एकाही कारखान्याने वाढीव भाव दिला नसल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. ऊसाचे अतिरिक्त उत्पादन असतानाही कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप केले. यावर्षी पाऊसमान कमी असलेने ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी बाहेरील कारखान्यांच्या फसव्या भूलथापांना बळी न पडता आपला ऊस आपल्याच हक्काच्या व विश्वासाच्या लोकनेते सुंदररावजी सोळंके साखर कारखान्यास देऊन आजपर्यंत जे सहकार्य केले तसेच आगामी काळातही सहकार्य करावे, असे आवाहन आमदार प्रकाश सोळंके यांनी करून गेल्या काही वर्षांत बाहेरील साखर कारखान्यांनी आपल्या भागातून १५०० ते १८०० रुपये दराने ऊस नेऊन शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचेही त्यांनी सांगितले. या वार्षिक सभेस परिसरातून सभासद, विविध संस्थांचे पदाधिकारी, खातेप्रमुख, कर्मचारी, कामगार उपस्थित होते.

Comment here