आपला जिल्हा

सद्गुरू श्रीमिस्कीन स्वामी मठात शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ

यंदाही दहा दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

माजलगाव : ऐतिहासिक परंपरा असलेल्या सद्गुरू श्री मिस्कीनस्वामी मठ संस्थान येथे शारदीय नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि.१५ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबरपर्यंत चालणार्‍या या सोहळ्याची सांगता दि.२४ ऑक्टोबर रोजी रजत पालखी सोहळा आणि दसरा दरबाराने होणार असल्याची माहिती संस्थान मठातर्फे देण्यात आली आहे.

संस्थान मठामध्ये साजरा होणारा हा शारदीय नवरात्र महोत्सव सोहळा भक्तांना साजरा करावा असे मार्गदर्शन माजलगाव मठाचे मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी केली आहे. शारदीय नवरात्र महोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. दि.१५ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबरपर्यंत श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य यांचे नवरात्र तपोनुष्ठान होणार असून प्रतिनित्य श्रीगुरूंची महापूजा, प्रसाद, दुपारी ४ ते ६ या वेळात भजन, श्रीगुरूंचे आशीर्वचन आणि शिवजागर असे कार्यक्रम होणार आहेत. रविवार, दि.१५ ऑक्टोबर रोजी सिंदफणा नदीचे पाणी कलशात आणून श्रींच्या मूर्तीचा अभिषेक झाला. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग नोंदविला मिरवणुकीत गाय आणि अश्वाची मिरवणूक काढण्यात आली. देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. याप्रसंगी विश्वनाथ शेटे यांनी सपत्नीक देवीची पूजा व आरती केली. दि.२४ ऑक्टोबर रोजी मठाच्या परंपरेनुसार दसरा दरबार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. दुपारी महाप्रसादानंतर सायंकाळी ५ वाजता श्रीगुरूंची रजत पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री ८ वाजता दसरा दरबात धर्मसभा होणार असून श्रीगुरूंच्या धर्मोपदेशाने या शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे. या दसरा महोत्सवास माजलगावसह बीड, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, गेवराई, पेठशिवणी, बहाद्दरपुरा आदी भागातून शेकडो भाविकांनी हजेरी लावतात. सर्व भक्तांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन शारदीय नवरात्रोत्सव समितीचे अध्यक्ष प्रशांतअप्पा प्रभाकरअप्पा शेटे, उपाध्यक्ष शिवहर मल्लिकार्जुअप्पा महाजन, कोषाध्यक्ष सुरेश बाबुराव कुरूळे, कार्याध्यक्ष अमोल रमेशअप्पा खोत यांच्यासह कार्यकारी मंडळाने केले आहे.

Comment here