‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाची जय्यत तयारी
बीड : ‘शासन आपल्या दारी’ या विशेष कार्यक्रमासाठी बीड जिल्ह्यातील परळी शहर सज्ज झाले असून मंगळवार, दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी ला वैद्यनाथ महाविद्यालय समोरील मैदानात हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी विकासकामांचे भूमिपूजन, पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण तसेच काही नवीन प्रकल्पांची घोषणा होणार आहे.
या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवर तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी आदींची उपस्थिती राहणार आहे. या ठिकाणी भव्य मंडप उभारले आहे. प्रतिनिधी लाभार्थ्यांची बसण्याची व्यवस्था मंचावर केलेली आहे. सभा मंडपाच्या परिसरात लाभार्थ्यांना वितरित होणारे साहित्य मांडण्यात येणार आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ थेट मिळावा म्हणून विभागाच्या वतीने दालने उभारण्यात येत आहेत. याची अंतिम पाहणी आज जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केली. यावेळी बारकाईने सर्व बाबींकडे अधिकारी कर्मचाऱ्यांना निर्देशित करून कोणाचीही गैरसोय होणार नाही असे निर्देशित केले. शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांसह सर्व मान्यवर सुरुवातीला गोपीनाथगड (पांगरी) येथे येणार असून त्याठिकाणी ते लोकनेते दि. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करणार आहेत. त्यानंतर ते १२ ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेतील व त्याठिकाणी २८६.६८ कोटी रुपयांच्या वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे भूमिपूजन करतील. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवरायांना वंदन केल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतुन आयोजित स्वागत रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, या रॅली नंतर थेट कार्यक्रम स्थळी वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदान येथे येतील व मुख्य शासकीय कार्यक्रमास सुरूवात होईल.
मान्यवरांचे अभूतपूर्व होणार स्वागत
दरम्यान शासकीय कार्यक्रमास सुरुवात होण्या अगोदर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहरात प्रथम आगमनानिमित्त सर्व मान्यवरांच्या अभूतपूर्व स्वागत रॅलीचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौकातून करण्यात येत आहे. या स्वागत रॅली मध्ये मणिपूर, केरळ, तिरुपती बालाजी, आंध्रप्रदेश, पंजाब, मुंबई आदी सहा ठिकाणावरून खास बँड पथक पाचारण करण्यात आले आहेत. तसेच पुष्पवृष्टी व रोषणाईद्वारे अभूतपूर्व स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. या रॅलीचा शेवट मौलाना आझाद चौकात आल्यानंतर होईल व त्यानंतर मुख्य शासकीय कार्यक्रमास सुरुवात होईल.
Comment here