जन्म आणि मृत्यू यामधील काळ म्हणजे जीवन होय. त्यामुळे माणूस किती काळ जगला याहीपेक्षा तो कसा जगला हे महत्वाचे, असे चित्रलेखा समुहाचे संस्थापक वजू कोटक यांचे विचार मनोमन पटतात. जगण्यावर सकारात्मक प्रेम करणारी माणसं गर्दीपेक्षा वेगळी ठरतात. पैशाच्या मागे धावणाऱ्या स्वार्थी जगात माणसं जोडणारी माणसं खरोखरचं निराळी असतात. किल्लेधारुर तालुक्यातील तेलगाव येथील यशवंत सोनटक्के यांचे जीवन यापेक्षा काही वेगळे नव्हते.
ज्येष्ठ पत्रकार यशवंत संतराम सोनटक्के हे २७ नोव्हेंबर 2023 रोजी आपल्याला कायमचे सोडून गेले. यशवंत सोनटक्के ऊर्फ तात्या या जगावेगळ्या अवलियाने घेतलेली एक्झिट मनाला चटका लावणारी आहे. जागृती सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून स्वतःच्या खिशातील पैसा खर्च करून तात्यांनी विविध आरोग्य विषयक, सामाजिक उपक्रम राबविले. जागृतीच्या स्थापनेपासून मी जवळचा साक्षीदार आहे. तेलगाव चौफाळ्यावरील माजलगाव रोडवरील पिंपळाच्या झाडाखाली पत्र्याच्या शेडमध्ये तात्यांनी सुरू केलेलं चहाचं छोटसं हाॅटेल आणि त्यानंतर तेच जागृती संस्थेचं झालेलं कार्यालय संत गाडगेबाबा यांच्या अभंगाप्रमाणे ‘सबके लिए खुला है मंदिर ये हमारा’ अगदी असेच होते. यशवंत तात्यांनी जीवनात काय कमावले, याचा विचार केला तर त्यांनी लाख मोलाची माणसे कमावली. अनेक लेखक, पत्रकार, समाज कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली, प्रसंगी अर्थिक सहकार्यही केले. मात्र त्यांची वाच्चता कुठेही केली नाही. नेकी कर औंर दर्या मे डाल या उक्तीप्रमाणे तात्यांचे जगणे होते. दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानणारे तात्या जगावेगळे रसायन होते. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना तात्यांनी आदर्श पत्रकारितेचा परिपाठ घालून दिला. विविध, जिल्हा आणि विभागीय दैनिकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी अतिशय तटस्थ पत्रकारिता केली. कुणावरही चिकलफेक न करणारी, कुणाची बदनामी न करता अतिशय सकारात्मक आणि विकासात्मक बातम्यांना प्राधान्य देत किमान दोन दशके पत्रकारिता केली, अनेक नवे पत्रकार उभे केले. पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना गोरगरीब तरूणांच्या हाताला हक्काचा रोजगार मिळावा म्हणून तात्यांनी हिंदुस्थान औद्योगिक सहकारी संस्था निर्माण केली. अंबाजोगाई येथे काजू प्रक्रिया प्रकल्पही सुरू केला. मात्र त्यांच्या संकल्पनेतील मोठा प्रकल्प मार्गी लागला नाही, हे स्वप्न त्यांचे अपूर्ण राहिले. उद्योग क्षेत्रात धडपडणाऱ्या तरूणांना काम देण्याची तळमळ तात्यांच्या ठायी होती. सतत कार्यमग्न आणि दुसर्यासाठी वेळ देणं याला तात्यांनी अगदी अग्रक्रम दिलेला होता. आजारपणातही माझा त्यांच्याशी सतत संवाद असायचा. इतक्या आजारात सुद्धा ते मला निराश वाटले नाहीत, हे त्यांच्या सकारात्मक ऊर्जेचे प्रतिक असावं.
साधारण १९९७-९८ च्या काळात तात्यांच्या सहचारिणी मंगलताई सोनटक्के तेलगावच्या सरपंच पदावर होत्या. तेलगाव ग्रामपंचायतीच्या इतिहासात मंगलताई सोनटक्के यांच्या रूपाने पहिल्या महिला सरपंच मिळाल्या. आपल्या सरपंचपदाच्या अल्पकाळातही तेलगावच्या विकासात भर घालणारे अनेक निर्णय घेतले. पाणी, वीज, रस्ते अशा मुलभूत गरजांना त्यांनी प्राधान्य दिले. त्यानंतर मंगलताई शासकीय सेवेत रूजू झाल्या. अंगणवाडी सेविका ते अंगणवाडी सुपरवायझर अशी मंगलताई यांची कारकीर्द घडविण्यातही यशवंत तात्या यांचे मोठे योगदान आहे. तात्यांचे आपल्यातून निघून जाणे सोनटक्के परिवारासाठी जेवढे वेदनादायी आहे, तीच वेदना माझीही आहे. तात्यांनी आयुष्यभर चांगुलपणाचा विचार दिला. संस्कार दिला. त्याच पावलावर पाऊल ठेवून संस्काराचा वारसा त्यांचे पूत्र दीपक, कृष्णा, कन्या रूपाली, वैशाली, सारिका, पुढे चालवत आहेत, हे किती आशावादी आहे.
: बाबा श्रीहरी देशमाने (संपादक, आरोग्यदूत मुंबई)
Comment here