विशेष वार्ता

झिंदाबाद जिजा!

बाबा श्रीहरी देशमाने

C‘Cast away Cast’ अर्थात जातीयवाद हद्दपार करा, अशी घोषणा देत दक्षिण अफ्रिकेतील डर्बानची वंशवाद प्रथाविरोधी परिषद दणाणून सोडणाऱ्या भारतीकडे साऱ्या जगाचे लक्ष वेधले, ते भारतीय म्हणजे मानवी हक्क अभियानचे संस्थापक अॅड.एकनाथराव आवाड. अॅड.आवाड यांना ‘जिजा’ या नावाने संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. मानवी हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणाऱ्या लढवय्या जिजांचा 19 जानेवारी जयंतीदिन. त्यानुषंगाने त्यांच्या प्रखर मानवतावादी विचारांचा जागर होणे गरजेचे आहे. अॅड.एकनाथराव आवाड यांचे संपूर्ण जीवन प्रत्येकाला संदेश देणारे आहे.


आंबेवडगावच्या ग्रामसभेपासून जिनिव्हातील मानवी हक्क संरक्षण परिषदेतही तेवढ्याच पोटतिडकीने बोलणारे जिजा एक चळवळ होते. पालावरच्या भिल्ल, पारधी, कोल्हाटी जमातींनाही झिंदाबाद बरोबरच जय भीम शिकवणारे ‘जिजा’ सच्चे आंबेडकरी विचारांचे पाईक होते. मानवी हक्क अभियानच्या बहराच्या काळात अनेक संघटना उदयास आल्या. मात्र काहींचा संकुचित दृष्टीकोन असल्याने त्या लयास गेल्या. मानवी हक्क अभियानने एक व्यापक विचार दिला. त्या व्यापक मांडणीच्या केंद्रस्थानी ‘जिजा’ होते. दलित पँथरच्या विचाराने प्रभावीत झालेल्या जिजांनी संघर्षात्मक आणि रचनात्मक अशा दोहो पातळीवर चिरकाल टिकणारे काम केले आहे. मराठवाड्यातील वाढते अत्याचार हा त्यांचा चीड आणणारा विषय होता. वेठबिगार मुक्तीपासून विद्यापीठ नामांतर चळवळीत जिजा सक्रीय होते. संपूर्ण आंबेडकरी चळवळीला नवा आयाम देण्याचे काम जिजांनी केले. त्यांच्यावर अनेक टिका, आरोप झाले मात्र घेतलेला वसा टाकायचा नाही, या जिद्दीने जिजा शेवटच्या श्वासापर्यंत नादान व्यवस्थेच्या विरोधात लढतच राहिले. आमचा लढा न्यायासाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी हा नारा घेऊन मानवी हक्क अभियानने मानवतावादी विचारांची पेरणी केली.

मानवी हक्क अभियानचे कार्यकर्ते झिंदाबाद बरोबरच ‘जयभीम’चाही नारा देत असत. अन्याय सहन करायचा नाही, त्यासाठी कशाचीही पर्वा न करता वाट्टेल ती किंमत मोजण्याची तयारी जिजांच्या ठायी होती. लोकांची जागृती करून व्यापक संघटन तेही आक्रमक शैलीत उभा करण्याचे कसब केवळ जिजांकडेच होते. जिजांच्या कार्याची नोंद घेत असताना त्यांच्यामुळे मराठवाड्यातील 50 हजार कुटुंबे गायरान जमिनीवर आपला उदरनिर्वाह करत आहेत, ही बाब लक्ष वेधून घेणारी आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या धम्माकडे ‘जिजा’ वळले. नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर आपल्या अनुयायासह बौध्दधम्म स्वीकारला. आयुष्यभर अन्यायाबाबत कसलीच तडजोड न करणाऱ्या जिजांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो.

Comment here