आपला जिल्हा

मनोज जरांगे पाटील यांची १२ डिसेंबर रोजी होणारी हरकी निमगावची महासभा ऐतिहासिक ठरणार

समाज बांधवांकडून जय्यत तयारी; सामाजिक सलोखा राखण्याचे प्रयत्न

माजलगाव : मराठा आरक्षण प्रश्न निर्णायक टप्प्यावर आणणारे लढवय्ये नेते मनोज जरांगे पाटील यांची येत्या १२ डिसेंबर रोजी माजलगाव तालुक्यातील माऊली फाटा हरकी निमगाव येथे महासभा होत आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू असून ही सभा ऐतिहासिक होणार असल्याची माहिती सकल मराठा समाज बांधवांनी दिली आहे.

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, या प्रमुख मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली- सराटी ता.अंबड या गावात मनोज जरांगे हे आमरण उपोषणाला दोन वेळा बसले होते. तीन टप्प्यांत महाराष्ट्र दौराही झाला. त्याचप्रमाणे चौथ्या टप्प्यातील दौऱ्यात माजलगाव तालुक्यातील माऊली फाटा-हरकी निमगाव या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची महासभा होणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी महाराष्ट्रातील मराठा समाज गेल्या अनेक वर्षांपासून लढा देत आहे. काही तज्ञ जाणकारांनी सांगूनही सरकारने चुकीच्या पद्धतीने न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाला वेळोवेळी फसवले आहे. यावेळी मात्र जरांगे पाटील यांनी जे उपोषण आंतरवाली- सराटी या ठिकाणी सुरू केले होते. हे उपोषण कायद्याला धरुन आधी मराठा आणि कुणबी एकच आहेत हे सिद्ध करा, या पद्धतीचे आहे. त्यामुळे समाजातील युवकांना कुठेतरी आता आपल्याला आरक्षण मिळेल, असा आशावाद वाटत आहे. परंतु सरकारने जरांगे पाटील यांना २४ डिसेंबर पर्यंतची वेळ दिली आहे. मराठा आरक्षणाचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असताना सरकारकडून या प्रश्नावर योग्य तोडगा निघेल की नाही याची शास्वती मराठा समाजाला दिसत नाही, अशी समाजबांधवामध्ये चर्चा आहे. मराठा समाज बांधवानी अतिशय शांततेत व संयमाने आपली भूमिका शासन दरबारी मांडलेली आहे. या पूर्वीच्या सरकारने वेळोवेळी फसवे आरक्षण देऊन समाजाची प्रचंड निराशा केली आहे. तशीच आताही होऊ नये यासाठी समाजातील अभ्यासू कार्यकर्त्यांसह समाजबांधव सरकारच्या प्रत्येक बाबींकडे बारकाईने लक्ष देत आहेत.

मराठा आरक्षण या विषयाचे प्रबोधन व्हावे, पुढील आंदोलनाची दिशा समाजबांधवांना सांगण्यासाठी चौथ्या टप्प्यातील दौऱ्यात माजलगाव तालुक्यात दि. १२ डिसेंबर रोजी माऊली फाटा, हरकी लिमगाव येथे दुपारी ४ वाजता भव्य जाहीर महासभा अखंड मराठा समाजबांधवाच्यावतीने आयोजित केलेली आहे. सभेच्या परिसरातील गावात जाऊन मराठा कार्यकर्त्यांनी सभेची माहिती देण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सभेच्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पार्कींगची व्यवस्था केलेली आहे. सभा सुरु होण्याच्यापूर्वी आलेल्या समाबांधवांच्या प्रबोधनासाठी शाहिरांचा कार्यक्रम सभा ठिकाणी ठेवण्यात आला आहे.पोलिस प्रशासनासोबत हजारो स्वयंसेवक या ठिकाणी काम करणार आहेत. प्रशासनामार्फत तसेच स्वयंस्फूर्तीने आरोग्य काळजीसाठी डाॅक्टर, ॲम्ब्युलन्स, नर्सेस, मेडिसीनची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सभेच्या ठिकाणी गावागावातून समाजबांधव स्वतःहून निधी देत आहेत. सभेची सुरूवात जिजाऊ वंदनेने तर समारोप हा राष्ट्रगिताने होणार आहे. सर्व सभांची तयारी जोरदार सुरू आहे. दरम्यान, लाखोंच्या संख्येने समाजबांधवानी मराठा ओबीसीकरण मनोज जरांगे पाटील यांच्या मनोगतातून समजून घेण्यासाठी या ऐतिहासिक सभेचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन अखंड मराठा समाज माजलगाव तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

तब्बल १०१ जेसीबीतून होणार पुष्पवृष्टी

संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या माजलगाव तालुक्यातील सभेची जय्यत तयारी सुरू असून त्यांच्या स्वागतासाठी तब्बल १०१ जेसीबी मशीन तैनात करण्यात आल्या आहेत. पार्किंगसह सुमारे १३० एकर परिसरात महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. आणखी वैशिष्ट्य म्हणजे माजलगाव शहारात मुस्लिम समाज, बौद्ध समाज यांच्यावतीने जरांगे यांचे स्वागत केले जाणार आहे. सभेसाठी येणाऱ्या समाज बांधवांची गैरसोय होऊ नये, यासाठी अनेक स्वयंसेवी कार्यकर्ते परिश्रम घेत असून विविध संस्था ,मित्रमंडळ मार्फत अन्नदान व पाणी वाटप करण्यात येणार आहे. दरम्यान, गावागाड्यातील सामाजिक एकोपा टिकून रहावा, जिव्हाळ्याचे संबंध निर्माण व्हावेत, यासाठी या सभांमधून विशेष प्रयत्न केले जात आहेत.

Comment here