संतप्त सामाजिक संघटनांचे अभिनव आंदोलन
माजलगाव : कामचुकार माजलगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांच्या कार्यालयात सारख्या दांड्या मारल्या जातात. या प्रकाराचा विविध सामाजिक संघटनांनी अभिनव आंदोलन करून निषेध नोंदविला आहे.
माजलगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण हे गेल्या अनेक महिन्यांपासून नियमितपणे नगरपरिषदेत न येता केवळ दलाली तसेच बोगस बीले काढण्यात पटाईत असलेले चव्हाण फक्त बिलांवर सह्या करण्यासाठी येतात. परंतु सामान्य माणसांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने न पाहता त्यांना दिवसेंदिवस नगरपालिकेच्या कार्यालयात चकरा मारायला लावतात. याचा निषेध म्हणून आज मंगळवार, दि.९ जानेवारी रोजी शेतकरी कामगार पक्ष, प्रहार संघटना, मौलाना आझाद युवा मंच, वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून त्यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. मुख्याधिकारी यांनी यापुढे नगरपरिषदेच्या कामकाजात सुव्यवस्था न आणल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. या आंदोलनात शेकापचे भाई ॲड.नारायण गोले पाटील, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष गोपाळ पैजणे, मौलाना आझाद युवा मंचचे जिल्हाध्यक्ष नुमान चाऊस, वंचित बहुजन आघाडीचे नेते राजरत्न खळगे, भारत डोंगरे हनुमान मनसुके, सलिम चाऊस, मयूर शर्मा आदींसह शहरातील नागरिक उपस्थित होते.
Comment here