आपला जिल्हा

माजलगावात शनिवारी ‘संवाद हृदयापासून हृदयापर्यंत’

यशवंत हॉस्पिटल, रोटरी क्लबचा संयुक्त उपक्रम 

माजलगाव : बदलती जीवन शैली, बदलत्या खानपान सवयीमुळे जगभरात हृदयरोगाचे प्रमाण वाढले असून त्यावर शंका समाधान शोधण्यासाठी माजलगावमध्ये रोटरी क्लब सेंट्रल व यशवंत हॉस्पिटल यांचे संयुक्त विद्यमाने ‘संवाद हृदयापासून हृदयापर्यंत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी, १०फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता केशवराज मंगल कार्यालय याठिकाणी हा संवादरूपी कार्यक्रम होत आहे.

यशवंत हॉस्पिटलचे संचालक डॉ.यशवंत राजेभोसले, रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष इम्रान नाईक, सचिव सुनिल शिंदे यांनी या उपक्रमाची पत्रकार परिषदेत माहिती दिली. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ.यशवंत राजेभोसले म्हणाले, वेळेचे कोलमडलेले गणित, त्याबरोबरच व्यस्त जीवनमानात वाढता ताणतणाव, तरुण वर्गात व्यायामाचा अभाव सोबत जंकफूडचे व्यसन, निद्रानाश इत्यादी कारणाने आजकाल तिशी चाळीशीमध्येच प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत हृदयरोगाबद्दल शंका समाधान व समाजात हृदयविकार संबंधी जागरूकता व्हावी, या उद्देशाने ‘संवाद हृदयापर्यंत हृदयापासून’ या परिसंवादाचे माजलगावमध्ये आयोजन करण्यात आले आहे. केशवराज मंगल कार्यालय येथे हा संवादरुपी प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होत असून यात डॉ.मुकुंद बजाज, डॉ.अमित दुल्लरवार, डॉ.यशवंत राजेभोसले व डॉ.शिवरत्न शेटे हे सहभागी होणार आहेत. पत्रकार संजय मालाणी हे या सर्व तज्ज्ञांची मुलाखत घेतील. यात उपस्थित श्रोत्यांमधूनही हृदय रोगासंबंधी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करतील. या बैठकीस डॉ.शामसुंदर काकाणी, डॉ.यशवंत राजेभोसले, पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश मोगरकर, अॅड.भानुदास डक यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

Comment here