महा-राष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे आरोग्यदूत

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कौतुक 

राळेगणसिद्धी : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. “हा तुमचा ६० वा वाढदिवस आहे, मात्र तुम्हाला शताब्दी साजरी करताना आम्हाला बघायचं आहे. सध्या लोकसंख्या वाढत चालली आहे आणि या वाढत्या लोकसंख्येत काम करण्यासाठी समाजाला तुमच्यासारख्या चांगल्या माणसाची गरज आहे,” असं म्हणत अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक करत त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. मुख्यमंत्र्यांनीही तुमचे आशीर्वाद असू द्यात, असं म्हणत अण्णांच्या शुभेच्छांचा विनम्रतापूर्वक स्वीकार केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी आज अण्णा हजारे यांची त्यांच्या राळेगणसिद्धी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेत रुग्णसेवेच्या कामाबद्दल माहिती दिली. तसंच अण्णा हजारे यांना आरोग्यदूत मासिकाचा नवा अंकही भेट देण्यात आला. यावेळी अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या आरोग्यसेवेच्या कामाचं तोंडभरून कौतुक केलं आणि मुख्यमंत्र्यांनाही फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

“माझे आणि एकनाथ शिंदेंचे संबंध फार जुने”

एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अण्णा हजारे म्हणाले की, “एकनाथ शिंदे आणि माझे फार जुने संबंध आहेत. राजकारण म्हणून नाही तर एक सेवाभावाने काम करणारा व्यक्ती म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो. ते फार चांगलं काम करत आहेत. आरोग्यक्षेत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मंगेश चिवटे यांचंही खूप चांगलं काम सुरू आहे. मी मागेही म्हटलं होतं की, राजकारण बरीच माणसं करतात. पण राजकारणात राहून आरोग्यसेवेचं काम फार थोडी माणसं करतात. लोकांचं आरोग्य कसं चांगलं राहील, यासाठी मुख्यमंत्री शिंदे, त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि मंगेश चिवटे काम करत आहेत. गरीब माणसाकडे उपचारासाठी पैसे नसतात, त्यामुळे हे लोक करत असलेलं काम फार महत्त्वाचं आहे,” अशा शब्दांत अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे.

Comment here