गंगाधर वानोळे
Gग्रामीण विकास केंद्रस्थानी मानून नगर जिल्ह्यातील राळेगणसिध्दी, हिवरेबाजार आणि औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा ही आपली आदर्श गावे ठरली आहेत. हिवरेबाजार, पाटोदा येथील विकासात्मक संकल्पना अंमलात आणून आपण इतर गावेही अशीच आदर्श करू शकतो, असा आत्मविश्वास देणारा हा विशेष लेख वर्तमानच्या वाचकांसाठी देत आहोत.
गावात प्रवेश करताच पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी प्रवेशद्वार असेल. गावातील सर्व रस्त्याच्या दुतर्फा झाडांनी नटलेल्या व प्रसन्न वातावरण निर्माण करणाऱ्या असतील. गावांतर्गत प्रत्येक रस्ता आरसीसी आणि नाल्या अंडरग्राउंड असतील. प्रत्येक घरासमोर पाणीपुरवठा करण्यासाठी नळ असेल आणि त्या नळाला २४ तास पाणीपुरवठा चालू असेल. गावातील सर्व रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर एलइडी स्ट्रीट लाईट बसवलेले असतील. गावात २४ तास लाईट उपलब्ध असेल. गावातील कोणीही रोजगार मिळवण्यासाठी बाहेरगावी जाणार नाही तर गावातच रोजगार उपलब्ध असेल. गावातील प्रत्येक शेतात मुबलक पाणी उपलब्ध असेल. मग मोठे सिंचन प्रकल्प किंवा जवळच्या कॅनॉलचे पाणी आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. प्रत्येक घर नावावर असेल आणि प्रत्येक घराला एकसारखा रंग असेल. त्यामुळे एकसंघपणाची भावना निर्माण होईल. गावात कोणीही बेरोजगार राहणार नाही. प्रत्येकाला क्षमतेनुसार गावातच रोजगार उपलब्ध असेल. कार्यालयीन सर्व कामे गावातच कमी वेळेत आणि कमी खर्चात करून मिळेल. जातीचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, दिव्यांगाचे, निराधरांचे प्रमाणपत्र अधिकाऱ्यांच्या समन्वयाने गावातच मिळेल.
जिल्हा परिषदेची शाळा ८ वीपर्यंत असेल आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल. गावात शैक्षणिक वातावरण निर्मिती केली जाईल. गावात व्यायामशाळा, वाचनालय, क्रीडांगण, मंगल कार्यालय, सभागृह, शाळेची दुमजली भव्य इमारत, बगीचा आदी बाबी असतील. त्यामुळे गावाच्या सौंदर्यात भर पडेल. प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात गावातील सर्वजण अनानंदाने सहभागी होतील. सार्वजनिक स्वरूपाचे काम स्वतःचेच आहे असे समजून त्याची काळजी घेण्याची भावना प्रत्येक गावकऱ्यामध्ये निर्माण होईल. सर्व विभागाच्या योजना राबविण्यात गाव यशस्वी होईल. गावातील गरिबी नाहीशी होऊन गावाची वाटचाल प्रगतीकडे होईल. गावातील प्रत्येक काम उत्कृष्ट होईल आणि सर्वजण त्या कामाकडे लक्ष देतील. महिन्यात झालेला खर्च ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावलेला असेल. पारदर्शक कारभार केल्याने विश्वासार्हता वाढून लोकसहभाग मिळेल. त्यामळे शासनाच्या प्रत्येक योजनेत गाव सहभागी होईल त्यामुळे गावात एकोप्याचे वातावरण निर्माण होईल आणि गावाला अनेक पुरस्कार मिळून गावचे नाव जिल्ह्यासह राज्यात आदरणारे घेतले जाईल.
Comment here