विश्व वार्ता

‘इन टू द डार्कनेस’ पटकावला यंदाचा सुवर्ण मयुर

गोव्यात हायब्रीड इफ्फीचे सूप वाजले

यंदाच्या इफ्फीत ६० देशांतील १२६ चित्रपटांचा समावेश

Pपणजी : इलेक्ट्रॉनिक्स कारखान्याच्या डॅनिश मालकाला नाझी सैन्यासाठी उत्पादन करण्यास भाग पाडण्यात आले होते, या कथानकावर आधारित चित्रपट ’इन टू द डार्कनेस’ या चित्रपटाने रविवारी 51व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला. दरम्यान, यंदाच्या हायब्रीड इफ्फीचे सूप वाजल. समारोह सोहळा कोरोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पालन करून करण्यात आला. या महोत्सवात रसिकांना ६० देशांतील १२६ चित्रपट पाहण्यास मिळाले.

गोवा : ज्येष्ठ अभिनेते विश्वजीत चटर्जी यांना इंडियन पर्सनॅलीटी ऑफ इयर पुरस्काराने गौरव करताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो आदी

गोव्यात बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर १६ ते २४ जानेवारी या कालावधीत झालेल्या ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप झाला. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत, माहिती प्रसारण विभागाचे सचिव अमित खरे, केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, चित्रपट महोत्सव संचालनालयाचे, महोत्सव संचालक चैतन्य प्रसाद आदी उपस्थित होते. अभिनेत्री सिमोन सिंग आणि अभिनेते रवी किशन यांनी या कार्यक्रमाचे संचालन केले. ‘इन टू द डार्कनेस’ या १५२ मिनिटांच्या डॅनिश चित्रपटाला ४० लाख रुपयांचा हा रोख पुरस्कार दिग्दर्शक अँडर्स रेफन आणि निर्माता लेने बोरग्लम यांना संयुक्तपणे विभागून देण्यात आला आहे. तसेच दोघांना प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. तैवानच्या दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्या चेन-नियन को यांना त्यांच्या २०२० च्या मँड्रिन भाषेतील चित्रपट ‘द साइलेंट फॉरेस्ट’ साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा रौप्य मयूर पुरस्कार प्राप्त झाला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीच्या रौप्य मयूर पुरस्कारात प्रमाणपत्र आणि १५ लाख रुपये रोख रक्कमेचा समावेश आहे.

या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, हिंदी आणि बंगाली चित्रपटांचे गायक विश्वजीत चटर्जी यांना इंडियन पर्सनॅलीटी ऑफ इयर तर अभिनेत्री झीनत अमान यांना जीवन गौरव पुरस्काराने या ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गौरवण्यात आले. याशिवाय अभिनेता रवी किशन, राहुल रवैल यांनाही सन्मानित करण्यात आले.

यंदाच्या इफ्फीचे ज्युरी मंडळ

51 व्या इफ्फीतील स्पर्धा विभागाचे परिक्षण अर्जेंटिनाचे दिग्दर्शक पाब्लो सीझर यांच्या अध्यक्षतेखाली जगभरातील नामवंत चित्रपट निर्मात्यांचा समावेश असलेल्या ज्युरी मंडळाने केले. प्रसन्ना विथानाज (श्रीलंका), अबू बकर शौकी (ऑस्ट्रिया), प्रियदर्शन (भारत) आणि रुबैयत हुसेन (बांगलादेश) हे ज्युरीमंडळाचे अन्य सदस्य होते

अरेबियन चित्रपटाला ‘युनेस्को गांधी पदक’

शांतता, सहिष्णुता आणि अहिंसा हे महात्मा गांधींचे आदर्श प्रतिबिंबित करणार्‍या चित्रपटासाठी असलेला विशेष आयसीएफटी युनेस्को गांधी पुरस्कार हा अमीन नायफेह यांच्या 2020 मधील ‘200 मीटर’ या अरेबियन चित्रपटाला मिळाला आहे. ज्यात मध्यपूर्वेती लइस्रायलच्या ताब्यात असणार्‍या प्रदेशात राहणार्‍या पॅलेस्टाईन वडिलांची कथा आहे जे दुभाजक भिंतीच्या एका बाजूला आहेत तर त्यांचा मुलगा पलीकडच्या बाजूला रुग्णालयात आहे आणि ते त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रमाणपत्र आणि पदक असे या पुरस्काराचे स्वरूप असून इंटरनॅशनल कौन्सिल फॉर फिल्म, टेलिव्हिजन आणि ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन (आयसीएफटी) पॅरिसच्या सहकार्याने इफ्फीच्या सहभागाचा भाग म्हणून हा पुरस्कार देण्यात येतो.

Comment here