ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांना जीवे मारण्याची धमकी
माजलगाव : ठेवीदारांचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.बीडच्या विरोधात लोकशाही मार्गाने न्यायालयीन लढा देणाऱ्या ठेवीदारांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी माजलगाव पोलिस ठाण्यात ज्ञानराधा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेश ज्ञानोबा कुटे, कर्मचारी प्रभाकर जीवनराव खुरने या दोघांविरुद्ध शनिवार, दिनांक ६ एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाला आहे.
ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.बीड माजलगाव शाखेत ठेवीदार शिवकांता गौरीशंकर तोडकरी, चतुराबाई रामलिंग पारडकर, आशाबाई सुर्यकांत पारडकर, दत्तात्रय सुर्यकांत पारडकर, ज्ञानेश्वर सुखलाल जाधव, दिनकर एकनाथ हांगे यांचा आपले कष्टाच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी पोलिस प्रशासन आणि न्यायालयीन लढा सुरू आहे. यापूर्वी २३ मार्च २०२४ रोजी माजलगाव पोलिस स्टेशनला रितसर तक्रार दिलेली आहे. त्यानंतर दिनांक ६ एप्रिल रोजी या प्रकरणाची माजलगाव येथील जिल्हा सत्र न्यायालयात तारिख होती. त्याकरिता हे सहा ठेवीदार कोर्टात हजर होते. शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ज्ञानराधा मल्टीस्टेटचा कर्मचारी प्रभाकर जीवनराव खुरने रा.उमरी ता.जि.बीड हा आला. त्याने माजलगाव कोर्टा बाहेरील श्री मंगलनाथ मंदीर परिसरात बोलवून तक्रार मागे घ्या. अन्यथा कुटे साहेब तुम्हा सगळ्यांना जिवंत सोडणार नाहीत अशी धमकी दिली. कोर्टातील केस चालू ठेवली तर एक दमडीही मिळणार नाही, असा सज्जड दम दिला. दरम्यान, सदरिल कर्मचाऱ्याने ठेवीदारांना अतिशय अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. तुम्हा सगळ्यांना पाहून घेऊ, अशी धमकी दिली. तुम्हाला कुटे साहेब जिवंत सोडणार नाहीत, अशी धमकी दिली. या प्रकरणी शिवकांता गौरीशंकर तोडकरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून ज्ञानराधा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेश ज्ञानोबा कुटे, कर्मचारी प्रभाकर जीवनराव खुरने या दोघांविरुद्ध माजलगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कुटे आणि खुरने यांच्याविरुद्ध ३०४, ३०६, ३४ भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
Comment here