आपला जिल्हा

‘ज्ञानराधा’च्या चेअरमनसह संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश

जिल्हा सत्र न्यायालयाचा निवाडा; ॲड.नारायण गोले पाटील यांचा यशस्वी युक्तीवाद 

माजलगाव : ठेवीदारांच्या ठेवी परत न करणाऱ्या मग्रूर ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.बीड या संस्थेला न्यायालयाचा दणका बसला आहे. दरम्यान, माजलगाव जिल्हा सत्र न्यायालयाने ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या चेअरमनसह संचालक मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा यशस्वी युक्तीवाद अॅड.नारायण गोले पाटील यांनी केला.

बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या संचालक मंडळासह कर्मचाऱ्यांनी केलेल्या आर्थिक फसवणुकीप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार देऊनही गुन्हा दाखल केला गेला नाही. शेवटी शहरातील खातेदारांनी न्यायालयात धाव घेऊन तक्रार दिली. या तक्रारीवर सुनावणी होऊन येथील पहिले सत्र न्यायाधीश अली एस.ए.एस.एम.यांनी शुक्रवारी माजलगाव शहर ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या संचालकासह कर्मचाऱ्यांवर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६ (३) अन्वये गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत. या मल्टिस्टेटच्या संचालकासह कर्मचाऱ्यांनी संगनमत करून खातेदारांच्या ठेवी परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी माजलगाव शहरातील खातेदारांनी पोलिस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. परंतु पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे मल्टिस्टेटच्या खातेदार शिवकांता गौरीशंकर तोडकरी, दिनकर हांगे, दत्तात्रय पारडकर, आशाबाई पारडकर, चतुराबाई पारडकर यांनी शेवटी माजलगाव येथील सत्र न्यायालयात धाव घेऊन ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या संचालकांसह कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी याचिका दाखल केली. माजलगाव येथील अॅड.नारायण गोले पाटील यांनी पहिले सत्र न्यायाधीश अली एस.ए.एस.एम. यांच्या न्यायालयात प्रकरणावर सुनावणीत युक्तिवाद केला. दरम्यान, येथील सत्र न्यायाधीश अली एस.ए.एस.एम. यांनी २९ एप्रिल रोजी माजलगाव शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना आदेश दिले आहेत.

Comment here