श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांचे आशिर्वचन
माजलगाव मठात गुरूपौर्णिमा उत्सव साजरा; १११ गुणवंतांना शिष्यवृत्तीचे वितरण
माजलगाव : अध्यात्मिक क्षेत्राची महानता जाणून समाजाने त्या दिशेने मार्गक्रमण करण्याची गरज निर्माण झाली आहे. गुरूपौर्णिमेचे महत्व आम्हाला पूर्वजांनी सांगितले आहे. त्यामुळे पूर्वजांनी दिलेल्या संस्कारक्षम विचाराने वागल्यास सुसंस्कारित पिढी निर्माण होईल, असे प्रतिपादन श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी रविवारी केले. दरम्यान, सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी संस्थान मठातर्फे १११ गुणवंतांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आली तर ९० गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. अशाप्रकारे माजलगाव मठात गुरूपौर्णिमा उत्सव विविध धार्मिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
शिक्षणामुळे माणसाच्या जीवनात अमुलाग्र बदल होतो. शिक्षणातच आयुष्याच्या प्रगतीची बीजे रोवलेली आहेत. त्यामुळे शिष्यवृत्ती प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा सदुपयोग करावा, असे स्पष्ट मत सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी संस्थान मठाचे विद्यमान मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी आज गुरूपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात मांडले. गुरूपौर्णिमेनिमित्त माजलगाव येथील श्री मिस्कीन स्वामी संस्थान मठात विविध कार्यक्रम घेण्यात आले. यात प्रामुख्याने इयत्ता दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली. या गुरूपौर्णिमा सोहळ्यास समाज बांधवांना मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी आशीर्वचनपर भाषणातून मार्गदर्शन केले. पुढे बोलताना श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज म्हणाले, माजलगाव येथील सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी संस्थान मठातर्फे दरवर्षी वीरशैव लिंगायत समाजातील गरजू व गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थ्यांनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. लिंगैक्य तपोरत्नं प्रभूपंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांनी समाजाच्या हितासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली. तो वसा आणि वारसा आम्ही समर्थपणे पुढे चालवू शिक्षण हे जीवनात अमुलाग्र बदल घडविणारे माध्यम आहे. त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करून जीवनाचे सोने करावे, असे भावनिक आवाहनही श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी केले. मिळालेल्या शिष्यवृत्तीचा अतिशय गांभीर्याने विचार करून शिष्यवृत्तीतील रक्कमेचा सदुपयोग करावा, असे समाजबांधवांना कळकळीचे आवाहनही महाराजांनी केले. गुरूपौर्णिमेनिमित्त माजलगाव येथील सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी संस्थान मठात विविध धार्मिक विधी पार पडल्या. समाजबांधवांकडून सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी संजीवन समाधीस रूद्राभिषेक, लिंगैक्य तपोरत्नं प्रभूपंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांच्या समाधीस अभिषेक, श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांची पाद्यपूजा करण्यात आली.
‘पुढील वर्षी शिष्यवृत्तीचे स्वरूप बदलणार’
शिष्यवृत्तीबाबत माहिती देताना श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज म्हणाले, पुढील वर्षापासून शिष्यवृत्ती स्वरूप बदलण्यात येणार आहे. बारावी नंतरच्या विद्यार्थ्यांना मेडिकल आणि इंजिनिअरिंगचा कोर्स पूर्ण होईपर्यंत शिष्यवृत्ती स्वरूपात मदत केली जाणार आहे. जीवनात मोठे झाल्यानंतर मठाने दिलेल्या शिष्यवृत्तीरूपी शिदोरीचा समाजाच्या भल्यासाठी उपयोग व्हावा, असेही आवाहन श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी केले.
वर्तमानच्या ‘दीपस्तंभ- गुरूपौर्णिमा’ विशेषांकाचे थाटात प्रकाशन
नेहमीच सकारात्मक पत्रकारितेला प्राधान्य देणार्या वर्तमान माध्यम समुहाने गुरूपौर्णिमेनिमित्त ‘दीपस्तंभ २०२४’ या दर्जेदार विशेषांकाची निर्मिती केली आहे. या विशेषांकाचे विद्यमान मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी श्री मंगलनाथ मल्टीस्टेटचे अध्यक्ष रामेश्वरआप्पा कानडे, महानंदा मल्टीस्टेटचे अध्यक्ष ओंकार खुर्पे, वर्तमान माध्यम समुहाचे मुख्य संपादक भगीरथ तोडकरी, शिवहार महाजन, रविंद्र कानडे, लिंगराज घुसे, राजभाऊ लोखंडे, आनंद तोंडुळे, संजय मोगरकर आदींसह मान्यवर उपस्थित होते. ‘दीपस्तंभ’ विशेषांकामध्ये माजलगाव मठाची दैदिप्यमान वाटचाल, लिंगैक्य तपोरत्नं प्रभूपंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांचा दिव्य संदेश, त्यांचे कारकीर्द आणि विद्यमान मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकलेला आहे. वर्तमान माध्यम समुहाचे मुख्य संपादक भगीरथ तोडकरी यांनी अंकाबद्दल उपस्थितांना माहिती दिली. याप्रसंगी दीपस्तंभ विशेषांकाचे सर्वस्तरातून कौतुक झाले.
Comment here