महा-राष्ट्र

पत्रकार संवाद यात्रेचे २८ जुलैपासून महाराष्ट्रव्यापी वादळ घोंघवणार

प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दीक्षाभूमी ते मंत्रालय संवाद दौरा; हजारो, पत्रकार, विचारवंत सहभागी होणार

मुंबई : लोकशाहीच्या बळकटीसाठी, पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी हे ब्रीद घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईची दीक्षाभूमी- नागपूर ते मंत्रालय-मुंबई अशी राज्यव्यापी पत्रकार संवाद यात्रेला येत्या २८ जुलैपासून प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली प्रारंभ होत आहे, अशी माहिती यात्रेचे मुख्य संयोजक तथा राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी दिली आहे.

संपूर्ण राज्यभर तगडे नेटवर्क आणि सर्वाधिक सदस्य संख्या असलेली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई ही एकमेव संघटना आहे. या संघटनेचे सक्षम नेतृत्व प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे हे करत आहेत. लोकशाहीच्या बळकटीसाठी, पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी हे ब्रीद सार्थ ठरवत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची जोमाने वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्र  राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि थेट जनतेशी संवाद साधण्याच्या दृष्टीने राज्यव्यापी दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी राज्यव्यापी पत्रकार संवाद यात्रा आयोजित केली आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नागपूरच्या दीक्षाभूमी येथून या पत्रकार संवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याला २८ जुलै रोजी प्रारंभ होत आहे. या यात्रेत हजारोंच्या संख्येने पत्रकार आणि नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती संयोजक प्रवीण सपकाळे यांनी दिली.

असा असेल पत्रकार संवाद यात्रेचा मार्ग

नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या मार्गदर्शनाने पत्रकार संवाद यात्रेला २८ जुलैला सुरुवात होईल. त्यानंतर वर्धा, अमरावती, अकोला, शेगाव, मुक्ताईनगर, जळगाव, धुळे, नाशिक आणि पहिल्या टप्प्याचा समारोप शिर्डी येथे ३ ऑगस्ट रोजी होणार आहे.  दुसरा टप्पा १२ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथून होईल आणि २० ऑगस्ट रोजी मंत्रालय मुंबई येथे समारोप होणार आहे. या पत्रकार संवाद यात्रेत राज्यभरातील पत्रकार, लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे जेष्ठ नेते, पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

त्यांच्याशी संपर्क साधू शकता..

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्यव्यापी पत्रकार संवाद यात्रेत सहभागी होणाऱ्या पत्रकार, मान्यवरांचे स्वागतच आहे. संवाद यात्रेबाबत अधिक माहितीसाठी प्रवीण सपकाळे यांच्याकडे ८८३०८७५२०८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

पत्रकार हा समाजाचा महत्त्वाचा घटक : प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे

पत्रकार हा खऱ्या अर्थाने समाजाचा आरसा आहे. तो समाजातील अतिशय महत्वाचा घटक आहे. लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी २४ तास उपलब्ध असणाऱ्या पत्रकारांचेही प्रश्न असतात याची जाणीवच राज्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींना नाही. या सर्व बाबींचा संवाद यात्रेत उहापोह होणार आहे, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Comment here