महा-राष्ट्र

प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

छत्रपती संभाजीनगर येथे हजारोंच्या उपस्थितीत ‘मुख्यमंत्री कृतज्ञता सोहळा’ साजरा

छत्रपती संभाजीनगर : येत्या चार दिवसांनी आपण देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहोत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना होती म्हणूनच आपण एक प्रजासत्ताक, सार्वभौम राष्ट्र म्हणून जगभर ओळखले जाऊ लागलो. डॉ. बाबासाहेबांच्या संविधानाचा आदर वाढावा, त्याद्वारे सामाजिक न्यायाची भावना अधिक दृढ व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. तसेच शहराचा विकास आराखडा हा सर्वांच्या हिताचा असेल तोच करु अशी ग्वाहीही त्यांनी शहरवासियांना दिली.

छत्रपती संभाजीनगर येथील टीव्ही सेंटर चौकात आज मुख्यमंत्री कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात अजिंठा लेणी पायथ्याशी जागतिक दर्जाचे बुद्धविहार विपश्यना केंद्र उभारणी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी ५० कोटी रुपये, भडकल गेट येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरणासाठी ५ कोटी रुपये, टीव्ही सेंटर येथे छत्रपती संभाजीमहाराज पुतळा व अशोक स्तंभ उभारणीसाठी ५ कोटी रुपये, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयासाठी २५ कोटी रुपये, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर डिजिटल प्रोजेक्टसाठी २५ कोटी रुपये, तारांगणासाठी १० कोटी तसेच मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेमार्फत बेरोजगारांना मदत अशा विविध विकास प्रकल्पांना निधी दिल्याबद्दल आज आंबेडकरी समाज समितीतर्फे मुख्यमंत्र्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. टीव्ही सेंटर मैदानावर आयोजित या सोहळ्यास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, आमदार प्रदीप जयस्वाल आणि संजय शिरसाट, संयोजक जालिंदर शेंडगे यांचेसह सर्व समिती सदस्य उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांना मानपत्र देऊन त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

कृतज्ञता महामानवाप्रति

ते म्हणाले की, आज आपण कृतज्ञता सोहळा आयोजित केला आहे. त्यानिमित्ताने माझ्यावर प्रेम व्यक्त करणाऱ्या छत्रपती संभाजीनगरातील आंबेडकरी जनतेचे मनापासून आभार मानतो. पण, कृतज्ञता व्यक्त करण्यासारखं कोणतंही काम मी केलेलं नाही. मी जे काही करतोय ते माझं कर्तव्य आहे.आणि इथे जी काही कामं होत आहेत तो तुमचा तो अधिकार आहे. आपण सगळे डॉ. बाबासाहेबांच्या महान कार्याला पुढं चालवणारे त्यांचे लहान अनुयायी आहोत. आपण भाग्यवान आहोत की, बाबासाहेबांसारखं मोठं व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रात जन्माला आलं. आपण या महामानवाप्रति कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आज ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मी उभा आहे, या भूमीवर बाबासाहेबांचे पवित्र पाऊल पडले आहे. बाबासाहेबांना या शहराबद्दल विशेष आपुलकी होती, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज आपण जगप्रसिध्द अजिंठा लेण्यांच्या पायथ्याशी सुंदर असं बुध्द विहार विपश्यना केंद्र उभारणार आहोत. बाबासाहेबांचा पुतळा उभारतो आहोत. शहरातल्या प्रत्येक झोपडपट्टीत वाचनालय,रिसर्च सेंटरचा डिजिटल प्रोजेक्ट, तारांगण सेंटर, मागास उद्योजकांना स्वत:च्या पायावर उभं करणं असे विविध उपक्रम आपण राबवत आहोत.यातून प्रेरणा मिळावी हा आपला हेतू आहे.

संविधानाबद्दल गौरवोद्गार

डॉ.बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावर आपला देश चालतो. चार दिवसांनी देशाचा ७८ वा स्वातंत्र्यदिन आहे. बाबासाहेबांची घटना होती म्हणूनच आपण एक प्रजासत्ताक, सार्वभौम राष्ट्र म्हणून जगभर ओळखले जातो. त्यामुळे संविधान बदलण्याच्या अपप्रचाराला आपण बळी पडू नका, असे सांगून ‘जब तक सुरज चांद रहेगा, बाबासाहेबका संविधान रहेगा’, अशा शब्दात त्यांनी संविधानाबद्दल गौरव व्यक्त केला.

महाराष्ट्र माझा परिवार

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, हे सरकार दुर्बल, मागस, कष्टकरी, कामगार, गरिबांचं आहे. यंदाच्या बजेटमध्ये एक लाख कोटींच्या योजना लागू केल्या आहेत. त्यापैकी ४५ हजार कोटी तर राज्यातील माझ्या भगिनींच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, युवा कार्यप्रशिक्षण, वर्षाला तीन सिलिंडर देणारी मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना सुरू केली. मुलींचं संपूर्ण शिक्षण मोफत केलं. दुर्बलांना मदत करणं, त्यांचं जीवन आनंदी करणं ही सरकारची जबाबदारी आहे. आणि महाराष्ट्र हा माझा परिवार आहे, अशा शब्दात त्यांनी उपस्थितांबद्दल आपुलकी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, मुंबईत इंदू मिल इथं बाबासाहेबांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्याचं काम वेगानं सुरु आहे.बार्टीच्या ८६१ विद्यार्थ्यांना आम्ही फेलोशिप मंजूर केली.बार्टी, सारथी,महाज्योती,अमृत, टीआरटीआय या संस्थाच्या अधिछात्रवृत्ती,परदेशी शिष्यवृत्ती या योजनांमध्ये समानता आणली. संजय गांधी, श्रावणबाळ योजनेत निवृत्तीवेतन वाढवलं. राज्यातल्या ७३ अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकांच्या वस्त्यांना नवे रूप देतो आहोत. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून गरीब, मागस, दुर्बलांना मुख्य प्रवाहात आणतोय,असे सांगून शासनामार्फत मागास घटकांच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहितीही उपस्थितांना दिली.

सर्वांच्या हिताचा विकास आराखडा

जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देणारा जळगाव जालना या महामार्गाच्या उभारणीसाठी शासनाच्यावतीने द्यावयाच्या ३५५२ कोटी रुपयांचा हिस्साही भरण्यास मान्यता दिली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर शहराच्या विकास आराखड्याबद्दल बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, सर्वांच्या हिताचा विचार करणारा विकास आराखडा आपण तयार करु, हे घर देणारे सरकार आहे लोकांना बेघर करणारे नाही,असे आश्वासन त्यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम खरात यांनी केले. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आ. प्रदीप जयस्वाल, खासदार संदिपान भुमरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पंचशिला भालेराव यांनी ‘शिंदे साहेबांनी आणली लाडकी बहीण योजना’ हे गीत सादर केले.या सोहळ्यास मोठ्या संख़्येने नागरिक उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रविणा कन्नडकर यांनी सूत्रसंचालन केले.

Comment here