आपला जिल्हा

जैतापूर येथे आदर्शवत कर्मचाऱ्यांचा गौरव

सरपंच भागवत दराडे यांचा स्तुत्य उपक्रम 

धारूर : ग्रामीण भागात कर्तव्य बजावताना सरकारी कर्मचारी टवाळखोरपणा करतात, वेळ काढू भूमिका यामुळे नागरिकांना त्रास व मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र जैतापूर ग्रुप ग्रामपंचायतचे कर्मचारी याला अपवाद ठरले आहेत. येथील तलाठी, सहशिक्षक, ग्राम रोजगार सेवक व कृषी सहाय्यक पदावरील कर्मचाऱ्यांनी केलेल्या कर्तव्य तत्परता व नागरिकांच्या सुलभ कामांमुळे जैतापूर ग्रामपंचायतच्या वतीने आदर्श कर्मचारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

आमदार प्रकाश सोळंके, बीड जिल्हा परिषदेचे माजी सभापती जयसिंह सोळंके यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात तलाठी आशिष वैजनाथ ठोंगे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सहशिक्षक श्रीराम शिंदे, जिल्हा परिषद शाळा देवठाणा सहशिक्षक विष्णू गंगणे, ग्राम रोजगार सेवक दत्तात्रय सोळंके व कृषी सहाय्यक शंकर पवार या कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. शेती निगडित कामांसाठी त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनास शिक्षकांनी नवऊर्जेने कार्य करण्यासाठी हा सन्मान करण्यात आल्याबाबत सरपंच भागवत दराडे यांनी भावना व्यक्त केल्या. उपसरपंच बाळासाहेब राठोड, ग्रामपंचायत सदस्य दीपक सोळंके, अशोक दराडे, वसंत सोळंके, कैलास दराडे, राजेभाऊ मोरे, मधुकर राठोड, बाबासाहेब चव्हाण, लक्ष्मण सोळंकेसह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Comment here