आपला जिल्हा

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मतभेद विसरून एकजूट होण्याची गरज 

श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांची समाजबांधवांना साद; तपोरत्नं प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांच्या जयंती सोहळ्याला प्रतिसाद 

माजलगाव : समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी आपसाआपसांतील सर्व मतभेद विसरून एकजूट करण्याची गरज आहे, समाजासमोर नवा आदर्श प्रस्थापित करावा, असे आवाहन सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी संस्थान मठाचे विद्यमान मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी केले आहे. दरम्यान, सोमवारी श्री संस्थान मठ माजलगाव येथे लिंगैक्य तपोरत्नं प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांच्या तृतीय जयंतीनिमित्त सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला समाज बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला.

लिंगैक्य तपोरत्नं प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांच्या तृतीय जयंती निमित्ताने श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली वीरशैव समाजातील सर्व लिंगायत व पोटजाती यांचा दुसरा वधू-वर परिचय मेळावा मोठ्या थाटात संपन्न झाला. सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी संस्थान मठाचे पूर्वाचार्य लिंगैक्य प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांचा तृतीय जयंतीनिमित्त विविध धार्मिक विधी आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलताना मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज आपल्या आशीर्वचनात म्हणाले, सामाजिक एकोपा टिकवून ठेवण्यासाठी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वीरशैव लिंगायत समाजाने इतर समाजाच्या तुलनेत आदर्श निर्माण करावा जेणेकरून समाजाचे हित होईल, असे आवाहन मठाधिपती यांनी केले. श्री संस्थान मठात सकाळी ८ वाजता ते १० वाजता लिंगैक्य श्रीगुरू तपोरत्नं प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांचे समाधीस रूद्राभिषेक, १० वाजता आरती व श्रीगुरूंचे आशिर्वचन व वधू-वर परिचय मेळावा झाला. वधू-वर परिचय मेळावा यशस्वी करण्यासाठी डॉ.गजाननआप्पा होन्ना, मनोहरअप्पा जामकर, कैलासआप्पा खुर्पे, राजाभाऊआप्पा लोखंडे, सुचेंद्रअप्पा महाजन, नितीनअप्पा शेटे, संजयअप्पा मोगरेकर, विकासआप्पा पाटील, प्रशांतआप्पा शेटे, रामेश्वरआप्पा काटकर, कैलासआप्पा लांडगे, सुरेशआप्पा कुरूळे, गणेश तोडकरी यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव पेठकर यांनी केले. तर वधू-वरांचा परिचय प्रा.गजानन होन्ना यांनी उपस्थितांना करून दिला.

लवकरच सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन 

सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी मठ संस्थान माजलगावच्या वतीने यंदाही भव्य स्वरूपात वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोटजातीतील वधू-वर परिचय मेळाव्याचे सोमवारी आयोजन करण्यात आला होते. काळाबरोबर सामाजिक बांधिलकीचा वसा घेत मठातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आजमितीला समाजाच्या हितासाठी वधू-वर परिचय मेळावा आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी दिली. दरम्यान, येत्या ३१ डिसेंबरपर्यंत वधू-वरांची नोंदणी करता येईल, लवकरच सामुहिक विवाह सोहळ्याचेही होणार असल्याचे श्री संस्थान मठा माजलगाव तर्फे कळविण्यात आले आहे.

 

Comment here