माजलगाव : हैदराबाद गॅझेटमध्ये स्पष्ट नोंदी असतानाही बंजारा समाजाला अद्याप अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गात न्याय मिळालेला नाही. त्यामुळे समाजातील तरुण शिक्षण, नोकरी व इतर संवैधानिक सुविधांपासून वंचित राहिला आहे. याच पार्श्वभूमीवर समाज नेते राम राठोड यांनी बंजारा समाजाचा समावेश एस.टी.प्रवर्गात करावा, अशी ठाम मागणी केंद्र व राज्य सरकारकडे केली आहे.
राम राठोड म्हणाले की, “हैदराबाद गॅझेटच्या दस्तऐवजामध्ये बंजारा समाजाची नोंद अनुसूचित जमाती प्रवर्गात झालेली आहे. परंतु स्वातंत्र्यानंतर राज्य पुनर्रचनेदरम्यान महाराष्ट्रात या समाजाला एस.टी.चे आरक्षण मिळाले नाही. परिणामी समाजातील लाखो विद्यार्थी व युवकांना शैक्षणिक, प्रशासकीय, शासकीय नोकरी व स्पर्धा परीक्षांमध्ये मागासलेपणाला सामोरे जावे लागत आहे.”
आज बंजारा समाज शैक्षणिक, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागे पडत आहे. एस.टी.चा दर्जा मिळाला असता तर अनेक तरूणांना उच्च शिक्षणात व रोजगाराच्या संधींमध्ये आरक्षणाचा लाभ झाला असता राठोड यांनी या अन्यायाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली.त्यामुळे सरकारने गांभीर्याने घ्यावे “आम्ही फक्त संविधानाने दिलेला हक्क मागतो आहोत. हैदराबाद गॅझेटचा दाखला सरकारसमोर ठेवला आहे. केंद्र व राज्य सरकारने तातडीने यावर सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा बंजारा समाजाला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल,” असा इशाराही राम राठोड यांनी दिला.
या मागणीला समाजातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. तरूण वर्गाने सोशल मीडियावरून समर्थन दिले असून, अनेकांनी ठिकठिकाणी बैठका घेऊन आपला पाठींबा जाहीर केला आहे. “आमच्या भावी पिढ्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही एकदिलाने सरकारकडे मागणी करतो,” असे मत बंजारा समाजातील युवकांनी व्यक्त केले. राम राठोड यांच्या पुढाकारामुळे आता बंजारा समाजात आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. या मागणीला राजकीय पातळीवरही महत्त्व प्राप्त होत असून, लवकरच राज्य सरकारसमोर हा प्रश्न गंभीरतेने मांडला जाणार आहे.



Comment here