एस.टी.प्रवर्ग आरक्षण प्रश्नी राम राठोड यांचा सज्जड इशारा
माजलगाव : हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत (एस.टी.) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, सकल बंजारा समाजाचा बीड येथे लाखोंच्या संख्येने मोर्चा निघाला. संपूर्ण महाराष्ट्रभर बंजारा समाज रस्त्यावर उतरत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने बंजारा समाजाचा अंत पाहू नये सज्जड इशारा युवा नेते तथा उद्योजक राम राठोड यांनी दिला आहे.
पुढे बोलताना युवा नेते राम राठोड म्हणाले, हैदराबाद गॅझेटच्या ऐतिहासिक दस्ताऐवजामध्ये बंजारा समाजाची अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात स्पष्ट नोंद आढळते. असे असताना सुध्दा अद्याप बंजारा समाजाला न्याय मिळालेला नाही. राज्य सरकारने समाजाच्या जनभावनेचा आणि लोकलढ्याचा आदर राखत त्वरित हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा एस.टी. प्रवर्गात समावेश करून समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी राम राठोड यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील बंजारा समाज शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. या सर्व बाबींचा विचार करून या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारने एस.टी.प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी राठोड यांनी केली आहे. बंजारा समाजाच्या संवैधानिक मागणीसाठी समाज रस्त्यावर उतरत आहे. बीड, जालना, सोलापूर येथे लाखोंच्या संख्येने समाज रस्त्यावर उतरत आहे. याची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे निघणार आहेत. सरकारने यावरही दखल घेतली नाही तर मुंबई आणि दिल्लीतही धडक दिली जाणार आहे. अशी माहिती राम राठोड यांनी दिली आहे.
‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देणार’
बंजारा समाजाला एस.टी.प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून निवेदन देणार आहे. दरम्यान, बंजारा समाजाच्या संविधानिक मागणीकडे सरकार सकारात्मक पाहिल आणि योग्य निर्णय घेईल, असा आशावादही राम राठोड यांनी व्यक्त केला.



Comment here