महा-राष्ट्र

राज्यातील २९ महापालिकांसाठी निवडणुका जाहीर

राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत घोषणा

मुंबई : राज्यातील प्रलंबित २९ महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल १६ जानेवारी रोजी लागणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. राज्यातील २९ महापालिकांसाठी ३ कोटी ४८ लाख मतदार मतदान करणार आहेत.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका या गेल्या पाच ते सात वर्षांपासून किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीपासून प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. त्यामध्ये सुरूवातीला २ डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्या. आता त्यानंतर राज्यातील प्रलंबित २८ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

महापालिकेच्या निवडणुकीचे वेळापत्रक :

नामनिर्देशन पत्र स्वीकारणे : २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर

अर्जाची छाननी : ३१ डिसेंबर

उमेदवारी माघारीची मुदत : २ जानेवारी

चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी : ३ जानेवारी

मतदान : १५ जानेवारी

निकाल : १६ जानेवारी

राज्यातील २७ महापालिकांची मुदत संपली आहे. त्यासोबत जालना आणि इचलकरंजी या दोन नवीन महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या महापालिका निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ रोजीची मतदान यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आली असल्याने त्यामध्ये नावे वगळण्याचे अधिकार राज्य आयोगाला नाहीत असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

एकूण मतदार : ३.४८ कोटी

एकूण मतदार केंद्र :३९,१४७

मुंबईसाठी मतदार केंद्र : १०,१११

कंट्रोल यूनिट : ११,३४९

बॅलेट यूनिट : २२,०००

निवडणूक खर्चाची मर्यादा

महापालिका निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगाने आखून दिली आहे. त्यामध्ये मुंबईसह अ वर्ग महापालिकांसाठी एका उमेदवाराला १५ लाख रुपये खर्च करण्याची मुभा आहे.

अ वर्ग : १५ लाख

ब वर्ग : १३ लाख

क वर्ग : ११ लाख

ड वर्ग : ९ लाख

या महापालिकांमध्ये निवडणूक होणार

१. बृहन्मुंबई : २२७

२. भिवंडी-निजामपूर : ९०

३. नागपूर : १५१

४. पुणे : १६२

५. ठाणे : १३१

६. अहिल्यानगर : ६८

७. नाशिक : १२२

८. पिंपरी-चिंचवड : १२८

९. औरंगाबाद : ११३

१०. वसई-विरार : ११५

११. कल्याण-डोंबिवली : १२२

१२. नवी मुंबई : १११

१३. अकोला : ८०

१४. अमरावती : ८७

१५. लातूर : ७०

१६. नांदेड-वाघाळा : ७१

१७. मीरा-भाईंदर : ९६

१८. उल्हासनगर : ७८

१९. चंद्रपूर : ६६

२०. धुळे : ७४

२१. जळगाव : ७५

२२. मालेगाव : ८४

२३. कोल्हापूर : ९२

२४. सांगली-मिरज-कुपवाड : ७८

२५. सोलापूर : ११३

२६. इचलकरंजी : ७६

२७. जालना : ६५

२८. पनवेल : ७८

२९. परभणी : ६५

Comment here