माजलगाव : तालुक्यातील किट्टी आडगाव येथे नागरिकांच्या प्रलंबित शासकीय कामांना गती देण्यासाठी ‘श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान शिबिर अभियान’ आयोजित करण्यात आले. दरम्यान, नागरिकांचे जीवनमान अधिक सुकर व्हावे आणि त्यांची विविध शासकीय कामे जलदगतीने मार्गी लागावीत, हा या शिबिराचा प्रमुख उद्देश असल्याची प्रतिपादन आमदार प्रकाश सोळंके यांनी केले.
याप्रसंगी आमदार प्रकाश सोळंके, सरपंच रूक्मानंद खेत्रे, कल्याण आबूज, तहसिलदार संतोष रूईकर यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिराच्या सुरूवातीला चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित गीत सादर करत शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या उपक्रमामुळे उपस्थित नागरिकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या शिबिरामध्ये शेती, आरोग्य, महसूल, महावितरण, पंचायत समिती, श्रावणबाळ योजना, पशुसंवर्धन तसेच कृषी विभागाचे स्वतंत्र टेबल लावण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय कामे सोयीस्करपणे पूर्ण करता आली. यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार प्रकाश सोळंके यांनी स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या वैयक्तिक अडचणी जाणून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्या तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. तसेच यापूर्वी झालेल्या शिबिराच्या फलनिष्पत्तीचा लेखी अहवाल सादर करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
या अभियानाच्या माध्यमातून शेतकरी, विद्यार्थी व महिलांना रहिवासी, उत्पन्न व जातीचे दाखले, रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना यांसारख्या विविध सामाजिक योजनांचा लाभ देण्यात येत आहे. तसेच सातबारा वाटप, प्रलंबित फेरफार नोंदी निर्गत करणे आणि विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक दाखले उपलब्ध करून देण्याचे कामही करण्यात आले. या उपक्रमाचा तळागाळातील नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.





Comment here