आपला जिल्हा

जाती-धर्माच्या भिंती तोडा; आपली माती, माणसं आणि नाती जपा

‘गुरूकृपा’ मंचावर अभिनेते संदीप पाठक भावनिक 

माजलगाव : आम्ही लहान होतो, त्यावेळी जाती धर्माच्या भिंती फार खुज्या होत्या, मागच्या काळात अनेकांनी त्यावर अनेक विटा रचून त्या माणसापेक्षाही मोठ्या केल्या आहेत. आपल्याला त्या भिंती तोडल्या पाहिजेत. जाती धर्माच्या भिंती तोडून आपली माती, माणसं आणि नाती जपा असे भावनिक आवाहन अभिनेते संदीप पाठक यांनी केले.

‘गुरुकृपा‘ शिक्षण समूहाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. प्रा.स्नेहल पाठक, संजय मालाणी, डॉ.विनोद काकडे, व्यंकटेश वैष्णव, पांडुरंग उगले, डॉ.रंगनाथ गोळेकर, डॉ.भांगरे, गुरूकृपाचे डॉयशवंत राजेभोसले यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी संदीप पाठक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपल्या जुन्या आठवणी जागवल्या. कितीही मोठे झालात तरी आपल्या मातीला आणि आपल्या आईवडील, मित्रांना विसरू नका, हेच लोक आपले पाय जमिनीवर राहायला मदत करत असतात असे सांगितले. आई-वडिलांना कर्जबाजारी करून लग्नावर कोट्यवधी खर्च करण्याची आजची पद्धत बदलण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले तसेच जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणूसपण जपा, हा संस्कार इथल्या मातीचा आहे, हातात दगड घेऊन कोणाचे तरी रक्त काढण्याऐवजी रक्तदान करून कोणाचा तरी जीव वाचवा. जातीवाद, धर्मवाद हा आपला मूळ स्वभाव नाही तर माणुसकी हा आपला मूळ स्वभाव आहे तो जपा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी डॉ.यशवंत राजेभोसले यांनी संदीप पाठक यांच्या जुन्या आठवणी जागवत गुरुकृपा समूहाचा प्रवास मांडला तर संजय मालानी यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या मैत्रीचा परीघ वाढवावा त्यासोबतच प्रत्येकाने कोठे थांबायचे याचे भान ठेवावे असे सांगितले. डॉ.विनोद काकडे यांनी गुरूकृपा मधून परिपूर्ण माणूस म्हणून विद्यार्थी निर्माण व्हावेत तसेच या परिवाराचा समाजाच्या विकासासाठी अधिकाधिक विस्तार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रज्वल म्हस्के यांनी केले, तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर सोळंके यांनी केले. यावेळी प्रकाश राजेभोसले, नंदिनी राजेभोसले, डॉ.वैशाली काकडे, डॉ.प्रियंका राजेभोसले, प्राचार्य अमित बिंदू, प्राचार्य मकेश बाबू आदींची उपस्थिती होती.

‘वऱ्हाड’ने उडविले हास्याचे कारंजे 

यावेळी संदीप पाठक यांनी वऱ्हाड निघालय लंडनला या एकपात्री प्रयोगातील काही प्रसंग सादर केले यावेळी सारा परिसर टाळ्या, शिट्ट्या आणि हास्याच्या कारंजांनी भरून गेला.

Comment here