माजलगाव : संपादकास मारहाण करून धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपी राजरोसपणे फिरत असून माजलगावमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संपादक भगीरथ तोडकरी यांना मारहाण करून ११ हजारांची लूट केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल असतानाही संबंधित आरोपी राजरोसपणे गावात फिरत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून अद्याप ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.
सदर प्रकरणात नारायण शेजुळ, राहुल शेजुळ व नितीन गायकवाड यांच्याविरुद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा नोंद होऊनही आरोपी गावात मोकाट फिरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, आरोपींकडून पुन्हा कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच, फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक केरबा माकणे करत असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे.



Comment here