आपला जिल्हा

माजलगावात ‘गो सम्मान आह्वान अभियान’ रॅली; गोवंश हत्येविरोधात नागरिकांचा आवाज

नागरिक आक्रमक; प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी 

माजलगाव : महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी होत असल्याचा दावा केला जात असताना बीड जिल्ह्यात मात्र खुलेआम कत्तल होत असल्याचा आरोप समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर माजलगाव येथे ‘गो सम्मान आह्वान अभियान’ अंतर्गत मोठी रॅली काढत नागरिकांनी प्रशासनाला निवेदन दिले.

बीड जिल्ह्यात गोवंश कत्तलप्रकरणी संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि सकल हिंदू समाजाने केला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी पोलीस ठाण्यांच्या परिसरातच गोवंशाची सर्रास कत्तल करून मांस विक्री होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची टीका करण्यात येत आहे. या प्रकरणी संतप्त नागरिकांनी कडक भूमिका घेत, ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंश हत्या होईल त्या ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाला निलंबित करावे, तसेच कत्तलखान्यासाठी गोवंश विकणाऱ्या शेतकऱ्यांवरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे. दरम्यान, 27 एप्रिल 2026 रोजी माजलगाव येथे ‘गो सम्मान आह्वान अभियान’ अंतर्गत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज चौक येथून रॅलीची सुरुवात झाली. हातात फलक, बॅनर घेऊन “गो माता राष्ट्र माता” अशा घोषणा देत युवक, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅली तहसिल कार्यालयात पोहोचल्यावर तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात देशभर गोहत्येवर कठोर बंदी लागू करावी आणि गोमातेला राष्ट्रीय सन्मानाचा दर्जा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनामुळे माजलगाव शहरात जनजागृती वाढल्याचे दिसून आले असून, प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास जिल्हाभर मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Comment here