आपला जिल्हा

तुळजाभवानी क्रेडिट सोसायटीचा ‘स्नेहजागर २०२६’ उत्साहात; २० वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा गौरव

छत्रपती संभाजीनगर : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने आपल्या २० वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा टप्पा गाठत ‘स्नेहजागर २०२६’ हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमात संस्थेच्या प्रवासाचा आढावा घेऊन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाखा व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल ‘द फर्ण’मध्ये ३ मे २०२६ रोजी तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा ‘स्नेहजागर २०२६’ हा भव्य सोहळा पार पडला. दोन दशकांच्या विश्वास, सातत्य आणि सहकाराच्या बळावर उभ्या राहिलेल्या संस्थेच्या प्रवासाचा हा उत्सव ठरला. कार्यक्रमाची सुरुवात मुख्य कार्यकारी अधिकारी शहाजी शेजुळ यांच्या प्रस्ताविक भाषणाने झाली. त्यांनी संस्थेच्या २० वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेताना आलेल्या आव्हानांवर मात करून साधलेली प्रगती आणि त्यामागील कर्मचाऱ्यांचे योगदान अधोरेखित केले. यानंतर ह.भ.प.श्यामसुंदर सोन्नर महाराज यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले, तर कविवर्य आत्माराम कुठे यांच्या काव्यसादरीकरणाने कार्यक्रमात रंगत भरली. या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाखा व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामुळे सन्मानितांना पुढील कार्यासाठी प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाला संस्थेचे मार्गदर्शक पुरुषोत्तम जाधव साहेब, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर देशमुख यांची उपस्थिती लाभली. समारोपाच्या अध्यक्षीय भाषणात चंद्रकांत शेजुळ यांनी संस्थेच्या भविष्यातील संधी व जबाबदाऱ्यांवर भाष्य केले. शेवटी आस्थापना विभाग प्रमुख अशोक मगर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. ‘स्नेहजागर २०२६’ हा सोहळा एकत्र येण्याचा, योगदानाचा सन्मान करण्याचा आणि नव्या उमेदीने पुढील वाटचालीस सज्ज होण्याचा प्रेरणादायी क्षण ठरला.

Comment here