आपला जिल्हा

एमएसआरडीसीच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करा

बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; प्रभू श्रीरामचंद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णा कानडे आक्रमक

माजलगाव : येथील भाविकांच्या वाहनाला शिंदेवाडी फाटा येथे झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेप्रकरणी प्रभू श्रीरामचंद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णा कानडे आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कथित निष्काळजी कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची तात्काळ बदली करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रभू श्रीरामचंद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णा कानडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

माजलगाव येथून श्रीक्षेत्र तुळजापूर येथे दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला १४ ऑक्टोबर २०२५ रोजी शिंदेवाडी फाटा येथे भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत पाच भाविकांचा मृत्यू झाला. या अपघाताला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) कथित निष्काळजी कारभारासह अपूर्ण रस्तेकामे आणि सुरक्षेतील त्रुटी जबाबदार असल्याचा आरोप प्रभू श्रीरामचंद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णा कानडे यांनी केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रतिष्ठानच्या वतीने मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

प्रभू श्रीरामचंद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णा कानडे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, या अपघाताच्या पार्श्वभूमीवर बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना वारंवार निवेदने देण्यात आली होती. मात्र, एमएसआरडीसीच्या संबंधित अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप प्रभू श्रीरामचंद्र प्रतिष्ठानने केला आहे. तसेच रस्त्यांचे सुरक्षा ऑडिट, दिशादर्शक फलक आणि वेगनियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष झाल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे.

दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

शिंदेवाडी फाटा येथे झालेल्या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी एमएसआरडीसी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्रभू श्रीरामचंद्र प्रतिष्ठानने केली आहे. यासोबतच बीड जिल्ह्यातील एमएसआरडीसी अंतर्गत असलेल्या सर्व अपूर्ण आणि धोकादायक रस्त्यांचे तातडीने सुरक्षा ऑडिट करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीसाठी आठ दिवसांची मुदत

कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप करत बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची तातडीने बदली करावी आणि त्यांच्या जागी जनताभिमुख अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी प्रभू श्रीरामचंद्र प्रतिष्ठानने केली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या भाविकांच्या कुटुंबीयांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

‘..अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार’

या मागण्यांवर आठ दिवसांत कार्यवाही न झाल्यास प्रभू श्रीरामचंद्र प्रतिष्ठानच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. प्रभू श्रीरामचंद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णा कानडे यांच्या वतीने हे निवेदन सादर करण्यात आले असून, त्याच्या प्रती छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य सचिवांना पाठविण्यात आल्या आहेत.

माजलगाव–तेलगाव रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

माजलगाव–तेलगाव–धारूर मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणावर भेगाही निर्माण झालेल्या दिसत आहेत.

Comment here